स्टॉकहोम : सैबेरियातील गोठलेल्या जमिनीत (पर्माफ्रॉस्ट) सापडलेल्या एका प्राचीन लांडग्याच्या पिल्लाच्या पोटातून शास्त्रज्ञांनी 14,400 वर्षांपूर्वीच्या ‘वूली र्हायनो’च्या म्हणजेच केसाळ गेंड्याच्या मांसाचा तुकडा शोधून काढला आहे. या अवशेषांच्या जनुकीय विश्लेषणातून असे समोर आले आहे की, हवामान बदलामुळे या प्रजातीचा अत्यंत वेगाने नाश झाला असावा.
2011 मध्ये सैबेरियात एका ममीफाईड (जतन झालेल्या) लांडग्याच्या पिल्लाचे अवशेष सापडले होते. त्याच्या शवविच्छेदनानंतर असे लक्षात आले की, त्याचे शेवटचे अन्न पृथ्वीवरील शेवटच्या काही वुली र्हायनोपैकी एकाचे मांस होते. स्वीडनमधील उप्साला विद्यापीठाचे बायोईन्फॉर्मेटिशियन कॅमिलो चॅकॉन-ड्यूक यांनी सांगितले की, ‘दुसर्या प्राण्याच्या पोटात सापडलेल्या हिमयुगातील प्राण्याच्या संपूर्ण जीनोमचा क्रम लावण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.’ ‘जीनोम बायोलॉजी अँड इव्होल्यूशन’ या नियतकालिकात 14 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी या मांसाच्या तुकड्याचे तुलनात्मक विश्लेषण केले.
शास्त्रज्ञांनी 14,400 वर्षांपूर्वीच्या या मांसाच्या तुकड्याची तुलना 18,000 आणि 49,000 वर्षांपूर्वीच्या जीनोमशी केली. त्यांना असे आढळले की, तिन्ही काळच्या गेंड्यांमध्ये जनुकीय विविधता स्थिर होती आणि त्यांच्यात ‘इनब्रीडिंग’चे (अंतःप्रजनन) प्रमाण वाढलेले नव्हते. सहसा एखादी प्रजाती नष्ट होण्यापूर्वी त्यांची संख्या कमी होऊन जनुकीय विविधता घटते (उदा. वूली मॅमथ). मात्र, वुली र्हायनोच्या बाबतीत असे घडले नाही. त्यांच्या लोकसंख्येत 14,400 वर्षांपूर्वीपर्यंत कोणतीही घट झाली नव्हती. याचाच अर्थ, हा प्राणी जनुकीय दोषांमुळे नव्हे, तर अचानक झालेल्या तीव्र हवामान बदलामुळे वेगाने नष्ट झाला.
वुली र्हायनो हे 35,000 वर्षांपूर्वी संपूर्ण उत्तर युरेशियामध्ये पसरलेले होते. काळानुसार त्यांचे वास्तव्य ईशान्य सायबेरियापुरते मर्यादित झाले आणि साधारणपणे 14,000 वर्षांपूर्वी ते पूर्णपणे नामशेष झाले. लांडग्याच्या पोटात सापडलेला हा मांसाचा तुकडा त्यांच्या विलोपनाच्या अगदी शेवटच्या टप्प्यातील असल्याचे कार्बन-डेटिंगवरून सिद्ध झाले आहे. या शोधामुळे वैज्ञानिकांना हिमयुगातील प्राण्यांच्या अस्तित्वाचा आणि निसर्गाच्या लहरीपणाचा अभ्यास करण्यासाठी नवी दिशा मिळाली आहे.