Alaska archaeological discovery | अलास्कामध्ये सापडली प्राचीन हत्यारे, हस्तिदंती अवजारे 
विश्वसंचार

Alaska archaeological discovery | अलास्कामध्ये सापडली प्राचीन हत्यारे, हस्तिदंती अवजारे

पुढारी वृत्तसेवा

अँकरेज (अलास्का) : अलास्कामध्ये अलीकडेच सापडलेली काही प्राचीन दगडी हत्यारे आणि अवशेषांमुळे अमेरिकेत मानवाचे पहिले पाऊल नेमके कधी आणि कसे पडले, यावर नवीन प्रकाश पडला आहे. एका ताज्या संशोधनानुसार, ही हत्यारे न्यू मेक्सिकोमधील प्रसिद्ध ‘क्लोविस’ संस्कृतीच्या अवशेषांपेक्षा सुमारे 600 वर्षे जुनी आहेत. मध्य अलास्काच्या तानाना व्हॅली येथील ‘होल्झमन’ साईटवर सुमारे 14,000 वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे आणि हत्तीच्या सुळ्यापासून बनवलेली म्हणजेच हस्तिदंती अवजारे सापडली आहेत. यामध्ये दगडी हत्यारे घडवण्यासाठी वापरला जाणारा ‘हॅमरस्टोन’ आणि धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणार्‍या ‘गेरू’चा समावेश आहे.

या शोधामुळे एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक दशकांपासून असे मानले जात होते की, आशिया आणि अमेरिकेला जोडणार्‍या ‘बेरिंग लँड ब्रिज’वरून मानव पायी चालत अमेरिकेत पोहोचला. मात्र, अलीकडच्या काळात काही शास्त्रज्ञांनी असा दावा केला होता की, मानवाने जमिनीवरून न येता समुद्रकिनार्‍याच्या मार्गाने बोटीतून प्रवास केला असावा. अलास्कामध्ये सापडलेली ही हत्यारे आणि क्लोविस संस्कृतीची हत्यारे यामध्ये कमालीचे साम्य आहे. यामुळे हे स्पष्ट होते की, क्लोविस लोकांचे पूर्वज अलास्का मार्गे जमिनीवरूनच दक्षिणेकडे सरकले असावेत.

20 व्या शतकात शास्त्रज्ञांचा असा ठाम विश्वास होता की, सुमारे 13,400 वर्षांपूर्वी क्लोविस संस्कृतीचे लोक आशियातून अमेरिकेत आले. मात्र, गेल्या काही वर्षांतील संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की, क्लोविस संस्कृतीच्या आधीही अनेक लोक अमेरिकेत राहत होते. हिमयुगात जेव्हा समुद्राची पातळी खालावली होती, तेव्हा जमिनीचा एक नैसर्गिक पूल तयार झाला होता, ज्याचा वापर करून हे शिकारी लोक अमेरिकेत दाखल झाले. ‘होल्झमन साईटवरील हे पुरावे अमेरिकेतील मानवी वस्तीच्या सर्वात जुन्या खुणांपैकी एक आहेत. यामुळे ‘आईस-फ्री कॉरिडोर’ (बर्फमुक्त मार्ग) आणि मानवी स्थलांतराच्या मार्गांबद्दलच्या आपल्या ज्ञानात मोठी भर पडली आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT