‘डीएनए’मधील प्राचीन विषाणू जनुकीय कोड करतात नियंत्रित Pudhari File Photo
विश्वसंचार

Ancient Viruses in DNA | ‘डीएनए’मधील प्राचीन विषाणू जनुकीय कोड करतात नियंत्रित

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, मानवाने प्राचीन विषाणूंपासून मिळवलेला डीएनए आपल्या जनुकीय कोडचे काही भाग चालू किंवा बंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मानवी जीनोमचा जवळपास अर्धा भाग ‘ट्रान्सपोसेबल एलिमेंटस्’ (Transposable Elements - TEs) नावाच्या तुकड्यांनी बनलेला आहे. यांना ‘जंपिंग जीन्स’ असेही म्हटले जाते, कारण ते जीनोममध्ये एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात. यापैकी काही TEs हे प्राचीन विषाणूंचे अवशेष आहेत, जे लाखो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांच्या जीनोममध्ये सामील झाले आणि तेव्हापासून पिढ्यान्पिढ्या पुढे संक्रमित होत आले आहेत.

अनेक दशकांपूर्वी जेव्हा TEs चा शोध लागला, तेव्हा शास्त्रज्ञांचा असा समज होता की त्यांचा कोणताही उपयुक्त उपयोग नाही आणि ते केवळ ‘जंक डीएनए’ आहेत. परंतु, हा नवीन अभ्यास या वाढत्या पुराव्यांमध्ये भर घालतो की हे वर्णन पूर्णपणे चुकीचे होते. हे डीएनए केवळ निष्क्रिय जीवाश्म नसून, जनुकीय अभिव्यक्तीचे नियमन करण्यासाठी, विशेषतः सुरुवातीच्या विकासाच्या काळात, अत्यंत महत्त्वाचे असू शकतात, असे या संशोधनातून सूचित होते. शास्त्रज्ञांनी त्यांचे निष्कर्ष 18 जुलै रोजी ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत. क्योटो विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर द अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी ऑफ ह्युमन बायोलॉजी’ येथील संशोधन समन्वयक आणि अभ्यासाच्या सह-लेखिका हिरोमी नाकाओ-इनुए यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आपल्या जीनोमचे सिक्वेन्सिंग खूप पूर्वी झाले आहे, परंतु त्याच्या अनेक भागांचे कार्य अद्याप अज्ञात आहे. जीनोमच्या उत्क्रांतीमध्ये ट्रान्सपोसेबल एलिमेंटस् महत्त्वाची भूमिका बजावतात असे मानले जाते आणि जसजसे संशोधन पुढे जाईल, तसतसे त्यांचे महत्त्व अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.‘

‘जंक’ डीएनएचे खरे महत्त्व

TEs ला ‘जंक’ म्हटले जात होते, कारण ते प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित नव्हते. प्रथिने हे असे रेणू आहेत जे पेशी तयार करतात आणि त्यांचे कार्य चालू ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिने तयार करण्याची माहिती असते, तर या पुनरावृत्ती होणार्‍या, जागा बदलणार्‍या भागांना ‘कार्यहीन’ डीएनए म्हणून दुर्लक्षित केले जात होते. मात्र, अलीकडच्या वर्षांत असे पुरावे समोर येऊ लागले आहेत की आपल्या जीनोमचे हे पुनरावृत्ती होणारे भाग जनुकीय नियमनात महत्त्वाची भूमिका बजावतात.

नॉन-कोडिंग आरएनए : या भागांच्या कोडचा वापर अनेकदा ‘नॉन-कोडिंग आरएनए’ तयार करण्यासाठी केला जातो. हा एक असा रेणू आहे जो इतर जनुकांना प्रभावित करून पेशींमध्ये फरक निर्माण करतो आणि गर्भाच्या वाढीचे नियमन करतो.

क्रिस्पर तंत्रज्ञान : ‘क्रिस्पर’ या प्रसिद्ध जनुकीय संपादन तंत्रज्ञानामुळे ट्रान्सपोसेबल एलिमेंटस्चा अधिक तपशीलवार अभ्यास करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञांना हे समजून घेता आले आहे की, TEs क्रोमॅटिनच्या रचनेवर कसा प्रभाव टाकतात आणि गर्भधारणेनंतर गर्भाच्या जनुकीय कार्याला कशी चालना देतात. या नवीन संशोधनामागील शास्त्रज्ञांनी ‘MER11’ नावाच्या TEs च्या एका विशिष्ट कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. हे कुटुंब TEs च्या एका मोठ्या वर्गाचा भाग आहे, ज्याने सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी प्रायमेट (primate) जीनोममध्ये प्रवेश केला होता. हा अभ्यास मानवी जीनोमच्या त्या भागांवर प्रकाश टाकतो, ज्यांना एकेकाळी निरुपयोगी समजले जात होते; परंतु आता ते आपल्या जैविक प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग असल्याचे सिद्ध होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT