कैरो : इजिप्तमधील तानिस येथील प्राचीन शाही थडग्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एक अविश्वसनीय खजिना सापडला आहे. हा शोध इतका दुर्मीळ आहे की, यामुळे इजिप्तचा इतिहास पुन्हा लिहावा लागणार आहे. संशोधकांना तानिसच्या वाळूखाली दडलेल्या एका थडग्यात 225 उत्कृष्ट कोरीव अंत्यसंस्काराच्या मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती एका रहस्यमय धार्मिक पद्धतीनुसार मांडलेल्या होत्या; पण आश्चर्य म्हणजे, या थडग्यात शरीर मात्र नव्हते. या मूर्तींपैकी निम्म्याहून अधिक मूर्ती स्त्रियांच्या आहेत. पण, आजवरच्या शाही दफनविधींबाबत जे संशोधन झाले आहे. त्यात स्त्रियांच्या मूर्ती आणि रहस्यमय धार्मिक विधीची माहिती आढळलेली नाही. यामुळे इजिप्तच्या तिसर्या मध्यवर्ती काळातील अंत्यसंस्काराच्या पद्धतींबद्दल नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या मूर्ती ताराकृती रचनेत आणि परिपूर्ण आडव्या रांगांमध्ये मांडलेल्या होत्या, ज्यामुळे गेल्या 3,000 वर्षांत या विधीला कोणीही स्पर्श केला नाही, हे सिद्ध होते.
फेरो शोशेंकचे रहस्य उलगडले
या मूर्तींवर असलेल्या शाही चिन्हांमुळे एक मोठे रहस्य उलगडले. या रिकाम्या थडग्यावरची मालकी फेरो शोशेंक तिसरा या राजाची असल्याचे निश्चित झाले. या राजाने इ.स.पूर्व 830 ते 791 पर्यंत राज्य केले होते; परंतु त्याचे अंतिम विश्रामाचे ठिकाण (फायनल रेस्टिंग प्लेस) अनेक दशकांपासून पुरातत्त्वशास्त्रज्ञांसाठी गूढ राहिले होते. या थडग्याच्या शोधाने जुने समज मोडून काढले आहेत आणि राजा स्वतःच्याच थडग्यात दफन का झाला नाही, हा प्रश्न पुढे आला आहे. राजा थडग्यात का नव्हता? या प्रश्नावर दोन शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. फ्रेंच इजिप्तोलॉजिस्ट फ्रेडरिक पायराडो यांच्या मते, शोशेंक तिसरा या राजाने ज्या काळात राज्य केले (इजिप्तचा तिसरा मध्यवर्ती काळ), तो काळ राजकीय फूट आणि सत्ता संघर्षाचा होता.
त्यांच्या 40 वर्षांच्या राजवटीत वरच्या आणि खालच्या इजिप्तमध्ये रक्तरंजित गृहयुद्ध झाले होते. यामुळे शाही उत्तराधिकार योजना (रॉयल सक्शेशन प्लॅन) अपेक्षेप्रमाणे झाली नसावी आणि राजांना त्यांच्या निवडलेल्या थडग्यात दफन करता आले नसावे. दुसरी शक्यता अशी आहे की, नंतरच्या काळात लुटारूंनी त्यांचे अवशेष हलवले असावेत. पायराडो म्हणाले की, एका राजासाठी थडगे बांधणे हे एक प्रकारचा जुगार असतो. कारण, तुमचा वारसदार तुम्हाला तिथे दफन करेलच याची खात्री नसते. तानिस येथील राजा तुतनखामूनच्या थडग्यानंतर 80 वर्षांतील हा सर्वात महत्त्वाचा शोध मानला जात आहे.