Roman Gold Mining | दोन हजार वर्षांपूर्वीचे रोमन ‘असे’ डोंगर फोडून काढत सोने! 
विश्वसंचार

Roman Gold Mining | दोन हजार वर्षांपूर्वीचे रोमन ‘असे’ डोंगर फोडून काढत सोने!

पुढारी वृत्तसेवा

रोम : दोन हजार वर्षांपूर्वीच्या रोमन अभियंत्यांनी डोंगर फोडून सोने बाहेर काढण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली होती. रोमन अभियंत्यांनी या डोंगरांमधून सोनं काढण्यासाठी एका अत्यंत महाकाय आणि तितक्याच विनाशकारी तंत्राचा वापर केला होता, ज्याला ‘रुइना मॉन्टियम’ (म्हणजेच डोंगरांचा नाश करणे) असे म्हटले जाते. सोनं मिळवण्यासाठी त्यांनी अक्षरशः संपूर्ण डोंगरच्या डोंगर भुईसपाट केले. हे करण्यासाठी त्यांनी निसर्गाच्या सर्वात मोठ्या शक्तीचा म्हणजेच ‘पाण्याचा’ वापर केला.

संशोधकांनी केलेल्या उत्खननात आणि ‘लिडार’सारख्या आधुनिक उपग्रहीय मॅपिंग तंत्रज्ञानातून या खाणकामाचे धक्कादायक टप्पे समोर आले आहेत : रोमन इंजिनिअर्सनी डोंगराच्या उंचावरील भागात पाणी साठवण्यासाठी ४.५ मीटर रुंद आणि १.५ मीटर खोल असे अनेक विशाल जलाशय आणि दगडी धरणे बांधली. अनेक किलोमीटर लांबून कालवे काढून पाणी या जलाशयांमध्ये आणले जात असे. त्यानंतर कामगारांनी आधुनिक उपकरणांशिवाय, केवळ छन्नी आणि हातोड्याच्या साहाय्याने डोंगराच्या आत अरुंद आणि खोल बोगद्यांचे जाळे तयार केले. हे बोगदे आतून पोकळ करण्यात आले होते. जसजसे बोगदे तयार झाले, तसे उंचावरील जलाशयांचे दरवाजे अचानक उघडले जात.

प्रचंड वेगाने आणि दाबाने येणारे लाखो लिटर पाणी या अरुंद बोगद्यांमध्ये सोडले जाई. पाण्याचा वेग इतका तीव्र असायचा की बोगद्यांमधील हवा दाबल्यामुळे तिथे प्रचंड प्रेशर तयार व्हायचे. पाण्याचा हा मारा आणि हवेचा दाब यामुळे अक्खा डोंगर अंतर्गत दबावाने फुटायचा आणि पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळायचा. डोंगर कोसळल्यानंतर उरलेला लाखो टन चिखल आणि माती पाण्याच्या प्रवाहाच्या साहाय्याने खाली आणली जायची. खाली बांधलेल्या मोठ्या लाकडी आणि दगडी चॅनेल्समधून हे पाणी वाहून नेले जाई. सोने वजनाने जड असल्याने ते तळाशी जमा व्हायचे आणि हलकी माती वाहून जायची. युनेस्कोने या परिसराला ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT