लंडन ः उत्तर सायप्रसमधील एका कांस्ययुगीन कबरीत एक अनोखे भांडे सापडले होते. त्यामध्ये चार गायी आणि अठरा मनुष्याकृती ठेवलेल्या दिसून आल्या. हे ‘वौनस बाऊल’ नावाचे भांडे सापडल्यापासून विद्वान अनेक दशकांपासून त्याच्या अर्थावर चर्चा करत आहेत. या चार हजार वर्षांपूर्वीच्या असामान्य भांड्याचा नेमका उद्देश अस्पष्ट असला, तरी बहुतेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यात कोणत्या तरी पवित्र द़ृश्याचे चित्रण आहे आणि त्याचा उपयोग धार्मिक समारंभात केला गेला असावा.
1930 च्या दशकात वौनस-बेलापेस या ठिकाणी झालेल्या उत्खननात एका मोठ्या प्रागैतिहासिक दफनभूमीतील डझनभर कबरी उघडकीस आल्या. जरी अनेक कबरी आधीच लुटल्या गेल्या होत्या, तरीही पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात गुंतागुंतीची नक्षीकाम केलेली मातीची भांडी हस्तगत केली, ज्यात ‘वौनस बाऊल’चा समावेश होता, जो काळाच्या ओघात अनेक तुकड्यांमध्ये मोडला होता. वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड विद्यापीठाच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ लुईस स्टील यांनी 2013 च्या अभ्यासात लिहिले आहे की, ‘वौनस बाऊल’, जे आता सायप्रस संग्रहालयात आहे, ते उथळ असून, त्याचा तळ सपाट आहे आणि त्याचा व्यास 14.6 इंच (37 सेंटिमीटर) आणि उंची 3.1 इंच (8 सेंटिमीटर) आहे. भांड्याच्या एका बाजूला एक खडबडीत, आयताकृती छिद्र आहे, जे संभाव्यतः दरवाजा दर्शवते. भांड्याच्या आत 18 मानवी आकृत्या, गोठ्यात असलेल्या चार गायी आणि काही फर्निचर यांनी बनलेले एक गुंतागुंतीचे द़ृश्य आहे.
दरवाजाच्या समोर तीन खांबांची एक रचना आहे, जी दोन नागमोडी रेषा असलेल्या आडव्या पट्ट्यांनी जोडलेली आहे - जे कदाचित एक देव्हारे असावे आणि त्याच्यासमोर एक मानवी आकृती गुडघे टेकून बसलेली आहे. काही आकृत्या बाकावर हात बांधून बसलेल्या आहेत आणि एक आकृती मुकुट घातलेली आणि एका प्रकारच्या सिंहासनावर बसलेली दिसते. 1994 च्या अभ्यासात, एडिनबर्ग विद्यापीठाचे पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक एडगर पेल्टेनबर्ग यांनी सुचवले की, ‘वौनस बाऊल’मध्ये तीन वेगवेगळी द़ृश्ये होती, ज्यात गायींसह एक गोपालक द़ृश्य; मुकुट घातलेल्या व्यक्तीसह पुरुष सत्तेचे संकेत; आणि गुडघे टेकलेल्या आकृत्यांसह आध्यात्मिक जगाचे प्रतिनिधित्व यांचा समावेश होता. एकत्रितपणे, ही द़ृश्ये त्या काळात विकसित होत असलेल्या नवीन, श्रेणीबद्ध सामाजिक व्यवस्थेचे प्रतिबिंब होती.