24000 years old creature | 24,000 वर्षांनंतर जिवंत झाला हा रहस्यमयी जीव! 
विश्वसंचार

24000 years old creature | 24,000 वर्षांनंतर जिवंत झाला हा रहस्यमयी जीव!

सैबेरियाच्या बर्फात होता गोठलेला; वैज्ञानिकांनी फुंकले प्राण

पुढारी वृत्तसेवा

मॉस्को : वैज्ञानिकांनी 24,000 वर्षांपूर्वीच्या एका प्रागैतिहासिक जीवाला पुन्हा ‘जिवंत’ करण्यात यश मिळवले आहे. आर्क्टिक क्षेत्रातील ‘पर्माफ्रॉस्ट’मध्ये (कायमस्वरूपी गोठलेली जमीन) हा सूक्ष्म जीव तब्बल 24 हजार वर्षांपासून सुप्तावस्थेतच अडकलेला होता. ‘बडेलॉइड रोटिफर’ (Bdelloid Rotifer) असे या जीवाचे नाव आहे. वैज्ञानिकांच्या या यशाने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले असून, अस्तित्त्व, वेळ आणि जैविक मर्यादांबाबत अनेक नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत.

बडेलॉइड रोटिफर हा जीव सैबेरियातील बर्फाळ जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर प्रयोगशाळेत त्याला पुन्हा जिवंत करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे हा जीव केवळ जिवंतच झाला नाही, तर त्याने स्वतःची संख्या वाढवण्यास (प्रजनन) सुरुवातही केली आहे. या संशोधनाबद्दलची माहिती ‘करंट बायोलॉजी’ नावाच्या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाली आहे. ‘24,000 वर्ष जुन्या आर्क्टिक पर्माफ्रॉस्टमध्ये सापडलेला जिवंत बडेलॉइड रोटिफर’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात वैज्ञानिकांनी दुजोरा दिला आहे की, हजारो वर्षे बर्फात गोठून राहिल्यानंतरही हा जीव यशस्वीरित्या पुन्हा सक्रिय झाला आहे.

उत्तर-पूर्व सैबेरियातून आणलेल्या पर्माफ्रॉस्टच्या नमुन्यांमध्ये या जीवाचा शोध लागला. वैज्ञानिकांनी जमिनीमध्ये खोलवर छिद्रे पाडली होती, जिथली माती अनेक शतकांपासून गोठलेली होती. ‘रेडिओकार्बन डेटिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून या मातीचे वय तपासले असता, ती सुमारे 24,000 वर्षे जुनी असल्याचे समोर आले. बडेलॉइड रोटिफर हे अत्यंत सूक्ष्म जीव असून ते सहसा गोड्या पाण्यात आढळतात. वैज्ञानिकांच्या मते, ‘क्रिप्टोबॉयोसिस’ या प्रक्रियेमुळे बडेलॉइड रोटिफर इतका काळ जिवंत राहू शकला. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये जीवाच्या शरीरातील चयापचय क्रिया पूर्णपणे थांबते. यामुळे तो जीव अत्यंत कठीण परिस्थितीतही जिवंत राहू शकतो. उदा. अतिशय कमी तापमान, पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) आणि ऑक्सिजनचा अभाव. हजारो वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतरही हा जीव जिवंत राहण्याचे रहस्य याच प्रक्रियेत दडलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT