Morocco fossil microorganisms | मोरोक्कोतील प्राचीन सूक्ष्मजीवांच्या जीवाश्मांनी बदलला जगाचा इतिहास 
विश्वसंचार

Morocco fossil microorganisms | मोरोक्कोतील प्राचीन सूक्ष्मजीवांच्या जीवाश्मांनी बदलला जगाचा इतिहास

खोल समुद्रातही जीवसृष्टीचे पुरावे

पुढारी वृत्तसेवा

मोरोक्को : शास्त्रज्ञांना मोरोक्कोमधील पर्वतरांगांमध्ये प्राचीन सूक्ष्मजीवांच्या वसाहतींचे असे काही जीवाश्म सापडले आहेत, ज्यामुळे पृथ्वीवरील सुरुवातीच्या जीवसृष्टीचा शोध आता अधिक खोल आणि अस्थिर भागात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या शोधामुळे जीवसृष्टी केवळ उथळ पाण्यातच अस्तित्वात होती, या जुन्या समजाला छेद मिळाला आहे.

मोरोक्कोच्या ‘सेंट्रल हाय अ‍ॅटलस’ पर्वतांमध्ये सुरकुत्यांसारखी रचना असलेले जीवाश्म आढळले आहेत. हे जीवाश्म ‘टर्बिडाइटस्’वर उमटलेले आहेत. टर्बिडाइटस् म्हणजे समुद्राखालील भूस्खलनामुळे तयार झालेले साचलेले थर. सहसा असे सूक्ष्मजीव उथळ पाण्यात आढळतात, जिथे सूर्याच्या प्रकाशाद्वारे ते ऊर्जा मिळवू शकतात. मात्र, हे जीवाश्म तब्बल 18 कोटी वर्षांपूर्वीचे असून, ते समुद्रसपाटीपासून किमान 590 फूट (180 मीटर) खोलवर तयार झाले होते. टेक्सास विद्यापीठातील भू-जीवशास्त्रज्ञ रोवन मार्टिनडेल यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे.

मार्टिनडेल यांनी सांगितले की, ‘अशा खोल पाण्यातील रचनेत सुरकुत्यांसारखे जीवाश्म आढळणे अनपेक्षित आहे.’ मार्टिनडेल यांना हे जीवाश्म मोरोक्कोच्या ‘दादेस व्हॅली’मध्ये संशोधनादरम्यान योगायोगाने सापडले. चालत असताना त्यांना पायाखालील दगडांवर लाटांसारख्या सुरकुत्या दिसल्या, ज्या सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा पुरावा होत्या. हे जीवाश्म इतक्या खोलीवर होते जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचणे कठीण होते. त्यामुळे हे सूक्ष्मजीव प्रकाशसंश्लेषणावर अवलंबून नसावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

रासायनिक चाचणीमध्ये या खडकांच्या थरांमध्ये कार्बनचे प्रमाण जास्त आढळले आहे, जे तिथे सजीव सृष्टी असल्याचे स्पष्ट संकेत देते. साधारण 54 कोटी वर्षांपूर्वी प्राण्यांची संख्या वाढल्याने अशा सूक्ष्म जीवाश्मांच्या खुणा नष्ट होत असत. मात्र, हे जीवाश्म 18 कोटी वर्षांपूर्वीचे असूनही सुरक्षित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा शोध ‘जिओलॉजी’ या मासिकात प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनामुळे आता शास्त्रज्ञांना जगातील सर्वात जुन्या जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी खोल समुद्र आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असलेल्या क्षेत्रांचा अधिक सखोल अभ्यास करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT