Ancient jaw fossil mystery | 27.5 कोटी वर्षांपूर्वीच्या विचित्र जबड्याच्या जीवाश्माचे उलगडले रहस्य 
विश्वसंचार

Ancient jaw fossil mystery | 27.5 कोटी वर्षांपूर्वीच्या विचित्र जबड्याच्या जीवाश्माचे उलगडले रहस्य

ब्राझीलमध्ये लागला ‘जिवंत जीवाश्मा’चा शोध

पुढारी वृत्तसेवा

रिओ डी जानेरिओ : काही वर्षांपूर्वी ब्राझीलमधील एका कोरड्या नदीपात्रात पॅलेओन्टोलॉजिस्टना (जीवाश्मशास्त्रज्ञ) एक अत्यंत विचित्र अशा जबड्याचे जीवाश्म सापडले होते. हा जबडा असामान्यपणे पिळवटलेला होता, ज्याचे खालचे दात बाहेरच्या दिशेला आलेले होते आणि प्लेटवर लहान दंतपट्ट्या होत्या. सुरुवातीला हा जबडा निसर्गामुळे किंवा काळानुसार दबला गेल्याने वेडावाकडा झाला असावा, असा वैज्ञानिकांचा अंदाज होता. मात्र, त्यानंतर अशाच प्रकारचे आणखी आठ जबडे सापडल्याने संशोधक चक्रावून गेले. आता ‘प्रोसीडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात या रहस्यमय जबड्याचा उलगडा करण्यात आला आहे.

संशोधकांच्या चमूने या प्रजातीला ‘तानिका अम्निकोला’ (Tanyka amnicola) असे नाव दिले आहे. हा प्राणी 27.5 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. विशेष म्हणजे, ज्या काळात तो वावरत होता, त्या काळातही तो त्याच्या पूर्वजांच्या अशा वंशावळीतील होता जी तोपर्यंत नष्ट झाली असावी असे मानले जात होते. म्हणूनच याला ‘जिवंत जीवाश्म’ म्हटले जात आहे. शिकागोच्या ‘फील्ड म्युझियम’मधील अभ्यासाचे लेखक जेसन पार्डो म्हणाले, ‘या जबड्याच्या विचित्र वळणाने आम्हाला अनेक वर्षे वेड लावले होते.

हा जबडा विकृत झाला आहे की काय, असा प्रश्न आम्हाला पडला होता. परंतु, आता आमच्याकडे नऊ जबडे आहेत आणि ते सर्व एकाच प्रकारचे आहेत. याचा अर्थ ही कोणतीही विकृती नसून, त्या प्राण्याच्या शरीराची रचनाच तशी होती. ‘टेट्रापॉड (Tetrapods) म्हणजे चार पाय असलेले व पाठीचा कणा असलेले प्राणी. सुमारे 37.5 कोटी वर्षांपूर्वी टेट्रापॉडचे दोन गट पडले : 1. जमिनीवर जगू शकणारे, अंडी घालणारे (ज्यापासून सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी उत्क्रांत झाले).

2. पाण्याची गरज असलेले, अंडी घालणारे (ज्यापासून आधुनिक उभयचर प्राणी बनले). ‘तानिका’ हा प्राणी दुसर्‍या गटातील असून तो त्याच्या काळातील प्रगत प्राण्यांसोबत राहत होता. संशोधकांच्या मते, हा प्राणी साधारण 3 फूट लांब, मोठ्या सॅलामँडरसारखा दिसत असावा. या प्राण्याचा जबडा वनस्पती खाण्यासाठी अनुकूल होता. खालच्या जबड्यावरील बारीक दात आणि बाहेर झुकलेले दात यांचा वापर वनस्पती रगडण्यासाठी आणि चघळण्यासाठी केला जात असे. वरच्या आणि खालच्या जबड्याचे दात एकमेकांवर घासले जाऊन अन्न ग्रहण करण्याची एक अनोखी पद्धत या प्राण्यामध्ये असावी, असा अंदाज पार्डो यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT