लंडन : आजच्या मानवापेक्षाही अधिक धोकादायक आणि धूर्त शिकारी या पृथ्वीवर कधीकाळी अस्तित्वात होता, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? शास्त्रज्ञांनी मानवाची एक लुप्त प्रजाती असलेल्या निएंडरथल्सबाबत एक असा खुलासा केला आहे, जो ऐकून अंगावर काटा येईल. जर्मनीच्या जंगलात आणि प्राचीन तलावांच्या खाली दडलेले एक असे रहस्य उघड झाले आहे, जे प्राचीन इतिहासाकडे पाहण्याचा आपला द़ृष्टिकोन बदलून टाकेल. आजपासून सुमारे 1.25 लाख वर्षांपूर्वी, जेव्हा संपूर्ण युरोप बर्फाच्या चादरीखाली झाकलेला होता, तेव्हा निएंडरथल्सनी अशा महाकाय हत्तींची शिकार करण्यास सुरुवात केली होती, ज्यांचे वजन आजच्या हत्तींच्या तुलनेत दुप्पट होते.
बर्याच लोकांचा असा समज आहे की, प्राचीन काळातील मानव फक्त गुहेत राहायचे आणि छोट्या प्राण्यांची शिकार करायचे. मात्र, जर्मनीतील एका नवीन संशोधनाने हा विचार पूर्णपणे मोडीत काढला आहे. संशोधकांच्या टीमने दावा केला आहे की, निएंडरथल्स केवळ बुद्धिमानच नव्हते, तर ते एका सुनियोजित रणनीतीअंतर्गत मोठ्या हत्तींची शिकार करायचे. हे संशोधन ईशान्य जर्मनीतील न्यूमार्क-नोर्ड भागात झाले आहे. 1,25,000 वर्षांपूर्वी हा परिसर तलाव आणि घनदाट जंगलांनी वेढलेला होता. येथे संशोधकांना 70 हून अधिक ‘स्ट्रेट-टस्कड’ (सरळ सुळे असलेले) हत्तींचे अवशेष सापडले आहेत.
हे हत्ती आधुनिक हत्तींपेक्षा आकाराने आणि वजनाने खूप मोठे होते. हत्तींच्या दातांच्या ‘इनेमल’वरील संशोधनात स्ट्रोंटियम, कार्बन आणि ऑक्सिजनसारख्या आयसोटोप्सची तपासणी करण्यात आली. यातून असे समोर आले की, काही नर हत्ती आपल्या आयुष्यात 300 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करून या भागात आले होते. नर हत्ती अन्नाच्या शोधात खूप दूरवर जात असत, तर मादी हत्ती एकाच परिसरात राहणे पसंत करत असत. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे, हे हत्ती कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा आजारपणामुळे मरण पावले नव्हते. त्यांच्या अवशेषांवर असलेल्या खुणांवरून असे सिद्ध होते की, निएंडरथल्सनी त्यांना वेढा घालून अत्यंत नियोजित पद्धतीने ठार केले होते.
निएंडरथल्स केवळ शिकारच करत नव्हते, तर ते या हत्तींचे मांस आणि चरबी अतिशय कौशल्याने वेगळी करत असत. हे ठिकाण एखाद्या मोठ्या ‘कत्तलखान्यासारखे’ होते, जिथे मोठ्या प्रमाणावर अन्नाची साठवणूक केली जायची. निएंडरथल्सनी या तलावाजवळील भागाचा वापर किमान 2,500 वर्षांपर्यंत केला. त्यांना त्यांच्या पर्यावरणाची अचूक माहिती होती. अशा महाकाय हत्तींची शिकार करण्यासाठी त्यांना जबरदस्त समन्वय आणि नियोजनाची गरज भासत असे, जे त्यांचे सामाजिक जीवन किती प्रगत आणि मजबूत होते हे सिद्ध करते.