Ancient Human Ancestors | प्राचीन मानवी पूर्वज पूर्वीच्या अंदाजापेक्षा उंच आणि सामाजिक! 
विश्वसंचार

Ancient Human Ancestors | प्राचीन मानवी पूर्वज पूर्वीच्या अंदाजापेक्षा उंच आणि सामाजिक!

पुढारी वृत्तसेवा

नैरोबी : सुमारे १३ ते २३ लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत अस्तित्वात असलेल्या ‘पॅरांथ्रोपस बॉईसी’ म्हणजेच ‘नटक्रॅकर मॅन’ या आपल्या प्राचीन मानवी पूर्वजाबद्दल संशोधकांनी अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. केनियामध्ये मिळालेल्या अश्मीभूत पावलांच्या ठशांच्या ताज्या विश्लेषणानुसार, हा प्राचीन मानव पूर्वी मानल्या जात असलेल्या आकारापेक्षा कितीतरी अधिक उंच, वजनदार आणि उच्च सामाजिक समजूत असलेला होता. शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध केले आहे.

शरीराच्या आकारमानात मोठी सुधारणा

मोठे दात आणि जबड्याच्या मजबूत स्नायूंमुळे ‘नटक्रॅकर मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मानवाची जुन्या अवशेषांवरून लावलेली उंची केवळ ४.२ फूट (१३१ सेमी) आणि वजन सुमारे ४९ किलोग्रॅम असावी, असा पूर्वीचा अंदाज होता.

परंतु, ईस्ट तुर्काना येथील ‘कुबी फोरा’ भागात सापडलेल्या २१ नवीन पावलांच्या ठशांच्या अभ्यासावरून संशोधकांनी सुधारित आकडेवारी मांडली आहे. नवीन गणनेनुसार, नटक्रॅकर मॅनची उंची आधुनिक मानवासारखी म्हणजे ६ फूट (१.८ मीटर) पर्यंत आणि वजन तब्बल ७५ किलोग्रॅमपर्यंत असू शकते.

होमो इरेक्टससोबत सहअस्तित्व

तलावाच्या चिखलात उमटलेले हे ४.७ इंच खोल ठसे प्राचीन मानवाच्या चालण्याच्या पद्धतीवरही प्रकाश टाकतात. ‘पॅरांथ्रोपस बॉईसी’ची पावले आधुनिक मानवाशी मिळतीजुळती असली, तरी त्यांच्या तळपायाची कमान थोडी सपाट होती आणि अंगठा इतर बोटांपासून थोडा दूर (अँगलवर) होता.

विशेष म्हणजे, याच तुर्काना खोऱ्यात ‘पॅरांथ्रोपस बॉईसी’ आणि मानवाचा थेट पूर्वज असलेला ‘होमो इरेक्टस’ हे दोन्ही मानवी वंश शेकडो वर्षे एकमेकांच्या शेजारी सहअस्तित्वात राहत होते. २०२४ च्या एका अभ्यासानुसार, या दोन्ही प्रजातींनी एकाच चिखलात अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पावले टाकल्याचे पुरावे मिळाले आहेत.

पावलांच्या ठशांमधून उलगडले सामाजिक जीवन

तब्बल १४ लाख वर्षांपूर्वीच्या या पावलांच्या ठशांच्या पॅटर्नवरून असे दिसून आले आहे की, ही पावले एकाच वेळी त्या परिसरातून एकत्र प्रवास करणाऱ्या ८ ‘पॅरांथ्रोपस बॉईसी’ व्यक्तींची होती. ‘हा परिसर प्राचीन मानवाचे शरीरशास्त्र, हालचाली आणि वर्तनाचा एक दुर्मीळ क्षण कॅप्चर करतो. पावलांचा हा समूह कदाचित तलावाच्या काठाने एकत्र फिरणाऱ्या केवळ वयस्क पुरुषांचा असावा. पाणघोडे आणि हिंस्त्र प्राण्यांच्या धोक्यामुळे संरक्षणासाठी ही पुरुषमंडळी एकत्र फिरत असावीत,’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. केव्हिन हटाला (चॅथम युनिव्हर्सिटी, पिट्सबर्ग) यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT