Gondwana Continent | प्राचीन ‘गोंडवाना’ महाद्वीप पृथ्वीच्या तब्बल ८० टक्के भूभागावर होते! 
विश्वसंचार

Gondwana Continent | प्राचीन ‘गोंडवाना’ महाद्वीप पृथ्वीच्या तब्बल ८० टक्के भूभागावर होते!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आता आपण अनेक खंडांनी आच्छादीत पृथ्वी पाहतो, पण एकेकाळी पृथ्वीवर एकच महाखंड किंवा महाद्विप होते, त्याचे नाव ‘गोंडवाना’. वैज्ञानिकांना या प्राचीन भूभाग ‘गोंडवाना’ चे अत्यंत महत्त्वाचे अवशेष सापडले असून, तो एक अवाढव्य ‘सुपरकॉन्टिनेंट’ होता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या नवीन शोधातून समोर आले आहे की गोंडवाना अत्यंत विशाल होता आणि पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे ८० टक्के भाग याच महाद्वीपाने व्यापलेला होता. हा महाद्वीप दक्षिण गोलार्धात ८० कोटी ते ५० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला होता आणि पृथ्वीवर गुंतागुंतीच्या जीवसृष्टीच्या विकासात याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

९ सप्टेंबर रोजी ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या प्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, गोंडवानाच्या सीमांचा शोध घेण्यासाठी २५,००० हून अधिक प्राचीन खडकांचे नमुने गोळा करण्यात आले. आतापर्यंत हा भूभाग पृथ्वीच्या दोन-तृतियांश भागावर पसरलेला होता असा अंदाज होता; मात्र आता तो ८० टक्के भागावर पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे ५३ कोटी ८० लाख वर्षांपूर्वी झालेला ‘कॅम्ब्रियन स्फोट’, ज्यामुळे पृथ्वीवर गुंतागुंतीची जीवसृष्टी बहरली, तो गोंडवाना महाद्वीपाच्या निर्मितीमुळेच झाला होता. अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी सांगितले की, पृथ्वीच्या गर्भातील अत्यंत क्लिष्ट प्रक्रियांमुळेच आज आपल्या सभोवताली दिसणारी बहुतांश जीवसृष्टी अस्तित्वात आली आहे. या घटनेआधी अब्जावधी वर्षे आपल्या ग्रहावर केवळ साधे सूक्ष्मजीव अस्तित्वात होते.

हा ऐतिहासिक शोध ‘डीप-टाईम डिजिटल अर्थ’ या आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शक्य झाला. या टीमने हजारो मॅग्मॅटिक (ज्वालामुखीजन्य) खडक गोळा केले आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक मोठा डेटाबेस तयार केला. हे खडक कधी आणि कुठे तयार झाले होते, याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी एआय आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे पृथ्वीवर पूर्वी अस्तित्वात असलेल्या इतर महाद्वीपांची पुनर्रचना समजून घेण्यास मोठी मदत झाली. कोट्यवधी वर्षांच्या भूगर्भीय हालचालींमुळे गोंडवानाचे तुकडे होऊन ते जगभरात पसरले. ‘सॅमॅरियम’ आणि ‘नियोडिमियम’ या घटकांचे आयसोटोप्स हे गोंडवानाचे ‘फिंगरप्रिंट’ म्हणून समोर आले असून, ते नवीन खडकांच्या आत सापडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT