लिमा : पेरूच्या पुरातत्त्वीय स्थळी सापडलेला आणि ‘शिरच्छेद करणारा’ देव ऐ अपाइक (Ai Apaec) याचे चित्रण असलेला नाकात घालण्याचा एक प्राचीन दागिना सध्या चर्चेत आहे. इ.स. 200 ते 900 या काळात बनवलेला हा दागिना, म्हणजेच सुमारे 1,500 वर्षांपूर्वीचा हा मौल्यवान अवशेष, पेरूतील मोचे संस्कृतीच्या शक्तिशाली आणि रहस्यमय परंपरेवर प्रकाश टाकतो.
हा सोन्याचा मुलामा दिलेला तांब्याचा दागिना आहे. उत्तर पेरूमधील लोमा नेग्रा नावाचे पुरातत्त्व स्थळ आहे, तिथे तो सापडला होता. सध्या तो न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे. या दागिन्यात मोचे संस्कृतीचा महत्त्वाचा देव ‘ऐ अपाइक’ याचे चित्रण आहे. हा देव शिरच्छेद करणारा म्हणूनही ओळखला जातो आणि त्याला व्यवस्था स्थापित करण्याची व सुव्यवस्था राखण्याची शक्ती आहे, असे मानले जात होते. मोचे कलाकृतीत, ऐ अपाइक याचे चित्रण सामान्यतः मानवी चेहरा, जॅग्वारचे सुळे आणि कोळीसद़ृश शरीर असलेले दिसते.
त्याच्या एका हातात ‘तुमी’ नावाचा चाकू आणि दुसर्या हातात शिराच्छेद केलेले मानवी डोके दाखवले जाते, जे त्याची शक्ती आणि वर्चस्व दर्शवते. या दागिन्यात देवाचे डोळे आणि बाजूचे नक्षीकाम नीलमणी आणि काळ्या रंगाच्या खड्यांनी जडवलेले आहेत. मोचे किंवा मोचिका म्हणून ओळखली जाणारी ही संस्कृती इंका साम्राज्याच्या उदयापूर्वी, इ.स. 200 ते 900 पर्यंत उत्तर पेरूच्या किनार्यावर नांदत होती. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना आढळून आले आहे की, मोचे संस्कृतीत त्यांच्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी मानवी बळीची प्रथा होती. अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की, केवळ पकडलेल्या शत्रूंनाच नाही, तर कधी कधी कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या उच्च-पदस्थ नातेवाईकांच्या सन्मानार्थ बळी दिला जात असे.