पिरॅमिडस्‌‍चे रहस्य 
विश्वसंचार

पिरॅमिडस्‌‍चे रहस्य : मानवी जिद्द की परग्रहावरील जीवांचे साहाय्य?

डॅनिकन यांचे 'प्राचीन अंतराळवीर' प्रकरण; आजही विज्ञानाला पडलेले एक मोठे कोडं

पुढारी वृत्तसेवा

लंडन : प्राचीन काळातील अवाढव्य पिरॅमिडस्‌‍ खरोखरच मानवांनी परग््राहावरील जीवांच्या (एलियन्स) मदतीशिवाय बांधले असतील का? की असे प्रश्न विचारणे हे भूतकाळापेक्षा आपल्या आधुनिक काळातील भीती आणि शंकांचेच दर्शन घडवते? स्विस लेखक एरिक फॉन डॅनिकन यांनी 1968 मध्ये त्यांच्या ‌‘चॅरियट ऑफ द गॉडस्‌‍‌’ या गाजलेल्या पुस्तकातून ‌‘एलियन्स‌’नी प्राचीन स्मारके बांधण्यास मदत केली असावी, असा विचार मांडला होता. जानेवारी 2026 मध्ये डॅनिकन यांचे निधन झाले असले, तरी त्यांनी मांडलेली ‌‘प्राचीन अंतराळवीर‌’ ही संकल्पना आजही लाखो लोकांना भुरळ घालत आहे.

डॅनिकन यांनी पिरॅमिडस्‌‍ आणि काही अनाकलनीय प्राचीन कलाकृतींचा हवाला देत असा दावा केला होता की, पृथ्वीबाहेरील जीवांनी मानवी संस्कृतीला आकार दिला. जरी संशोधकांनी हे दावे वारंवार खोडून काढले असले, तरी ‌‘एन्शियंट एलियन्स‌’ सारख्या दूरचित्रवाणी मालिकांमुळे हे कथानक आजही जिवंत आहे.

तज्ज्ञांच्या मते, डॅनिकन यांचे सिद्धांत एका विशिष्ट कालखंडात उदयास आले. शीतयुद्धाचा काळ, अण्वस्त्रांची भीती, अंतराळ स्पर्धा आणि वेगाने बदलणारे तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर हे विचार रुजले. मानव जेव्हा पृथ्वी सोडून बाहेर जाण्याची तयारी करत होता, तेव्हा ‌‘प्राचीन अंतराळवीरांच्या‌’ कल्पनेने एक प्रकारचे वैश्विक आश्वासन आणि थरार निर्माण केला. काही लोक अशा निराधार सिद्धांतांवर विश्वास का ठेवतात, याचे मूळ पुरातत्त्वशास्त्राच्या स्वरूपात आहे. हे शास्त्र तुकड्यांमधील पुरावे आणि गुंतागुंतीच्या थरांवर काम करते, जिथे निष्कर्ष काढणे सोपे नसते. मात्र, इजिप्तमधील गिझा, तुर्कीमधील गोबेक्ली टेपे आणि ट्रॉय ही ठिकाणे कोणतीही न सुटलेली कोडी नसून अनेक दशकांच्या पद्धतशीर उत्खननाचा आणि विश्लेषणाचा परिणाम आहेत. संशोधकांना गिझा येथे कामगारांच्या वसाहती, बेकरी आणि अन्नपुरवठा व्यवस्था सापडली आहे. यावरून हे सिद्ध होते की, हजारो कामगारांच्या संघटित श्रमातून दशकानुदशके काम करून पिरॅमिडस्‌‍ उभारले गेले.

गोबेक्ली टेपे येथे लेखनाच्या शोधापूर्वीच शिकारी समुदायांनी केवळ मानवी श्रम आणि सामाजिक समन्वयातून भव्य दगडी स्तंभ उभे केले होते. ट्रॉय येथे एकावर एक असलेले वसाहतींचे थर अनेक शतकांचे पुनर्निर्माण आणि प्रादेशिक देवाणघेवाण दर्शवतात, कोणतेही अचानक आलेले परकीय तंत्रज्ञान नाही. सूडोसायन्स (छद्मविज्ञान) हे विज्ञानातील सावधगिरीला ‌‘साशंकता‌’ मानून तिथे काल्पनिक मनोरंजनाची भर घालते. ‌‘पिरॅमिडस्‌‍ अतिशय अचूक आहेत; इतकी अचूकता आधुनिक यंत्रांशिवाय शक्य नाही. म्हणून ते एलियन्सनी बनवले,‌’ असा युक्तिवाद केला जातो. हा तर्क वरवर बरोबर वाटला, तरी तो चुकीच्या गृहीतकावर आधारित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT