विश्वसंचार

Egypt Cyprus Mural Discovery | प्राचीन इजिप्तमधील वास्तूंवर सापडली सायप्रसची ‘भित्तिचित्रे’

पुढारी वृत्तसेवा

कैरो : इजिप्तमधील हजारो वर्षे जुन्या आणि ऐतिहासिक वास्तूंवर प्राचीन काळातील पर्यटकांनी कोरलेली नावे आणि संदेश (ग्राफिटी) नेहमीच संशोधकांचे लक्ष वेधून घेत आले आहेत. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका ऐतिहासिक अहवालानुसार, इजिप्तच्या प्रसिद्ध पिरॅमिडस्‌ आणि मंदिरांच्या भिंतींवर 'सायप्रस' बेटावरून आलेल्या नागरिकांनी कोरलेली अनेक गुपिते समोर आली आहेत. यामुळे प्राचीन काळातील व्यापार, युद्ध आणि संस्कृतीवर नवा प्रकाश पडला आहे. इतिहासकार बीट्रिस पेस्टॅरिनो यांच्या मते, इजिप्तमधील गिझाचे पिरॅमिड, अबिडोस आणि कर्नाक येथील मंदिरांच्या भिंतींवर सायप्रसच्या लोकांची किमान १४९ अक्षरे किंवा नावे सापडली आहेत. ही नावे प्रामुख्याने इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील आहेत.

'सायप्रस अक्षरांचा' वापर

या शोधाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यातील १३५ कोरीव कामे ही सायप्रसच्या प्राचीन 'सिलेबरी' लिपीत आहेत. ही लिपी ग्रीक मुळाक्षरांपेक्षा वेगळी असून, यात प्रत्येक चिन्हाचा अर्थ एक संपूर्ण शब्द किंवा उच्चार असा होतो. यावरून असे दिसून येते की, त्या काळी सायप्रसमधून आलेले लोक केवळ सुशिक्षित नव्हते, तर त्यांना एकापेक्षा जास्त भाषांचे ज्ञान होते.

पर्यटक की भाडोत्री सैनिक?

संशोधकांनी या कोरीव कामांचे दोन भागांत वर्गीकरण केले आहे. पहिले आहे पर्यटक आणि व्यापारी. यात गिझाच्या भव्य पिरॅमिडवर 'क्रॅटँड्रॉस' आणि 'थेमितो' या जोडप्याने स्वतःची नावे कोरली आहेत. अनेक पर्यटकांनी इजिप्तची अवाढव्य मंदिरे पाहून 'आम्ही हे पाहिले आणि थक्क झालो' अशा भावनाही लिहिल्या आहेत. दुसरे आहेत भाडोत्री सैनिक. यात सर्वात जास्त कोरीव कामे ही सैनिकांची आहेत. चौथ्या शतकात सायप्रसचा राजा 'इव्हागोरस' आणि इजिप्तचा फॅरो 'अकोरीस' यांच्यात इराणच्या (अचेमेनिड साम्राज्‍य) विरोधात राजकीय युती झाली होती. या युद्धात सायप्रसचे हजारो भाडोत्री सैनिक इजिप्तच्या बाजूने लढत होते. या सैनिकांनी छावण्यांच्या ठिकाणी आणि मंदिरांवर आपली नावे, टोपणनावे आणि आपल्या गावांची नावे कोरून ठेवली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT