कैरो : प्राचीन इजिप्तमध्ये सुमारे ५,००० वर्षांपूर्वी म्हणजेच देशाचे प्रथमच एकत्रीकरण झाले त्या काळानंतर प्रारंभी मानवी बळी देण्याची प्रथा अस्तित्वात होती, असा महत्त्वपूर्ण खुलासा एका नवीन संशोधनातून झाला आहे. अमेरिकेतील ‘पर्ड्यू युनिव्हर्सिटी’मधील मानववंशशास्त्र संशोधक रोझेलिन कॅम्पबेल यांनी प्राचीन अबिडोस या पवित्र शहरात सापडलेल्या ४६ मानवी कवटींच्या अवशेषांची आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाद्वारे पुनर्तपासणी केली. या कवट्या राजा जेर (King Djer), राजा जेट (King Djet) आणि राणी मेरेतनेथ (Meretneith - ज्यांनी काही काळ इजिप्तवर राज्य केले असण्याची शक्यता आहे) यांच्या राजेशाही थडग्यांच्या जवळ गाडलेल्या व्यक्तींच्या आहेत. हे तिन्ही राज्यकर्ते पहिल्या राजवंशातील होते, ज्याची सुरुवात सुमारे ५,००० वर्षांपूर्वी अप्पर (ऊर्ध्व) आणि लोअर (निम्न) इजिप्तचे एकाच साम्राज्यात एकत्रीकरण झाल्यानंतर झाली होती. राजांच्या सेवेत असलेल्या नोकर-चाकरांचे बळी देऊन त्यांना राजाच्या थडग्याशेजारीच पुरण्यात आले होते.
या राजेशाही दफनभूमीचे पहिले उत्खनन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्लिंडर्स पेट्री या पुरातत्त्वशास्त्रज्ञाने केले होते. त्यावेळी पेट्री यांनी असा दावा केला होता की, राजेशाही थडग्यांच्या शेजारी सापडलेले शेकडो गाडलेले अवशेष हे राजाच्या सेवेतील नोकर आणि सेवकांचे आहेत. राजाच्या मृत्यूनंतर मृत्यूनंतरच्या जगात राजाला सेवा पुरवता यावी, या धार्मिक श्रद्धेतून या सेवकांचा बळी दिला गेला असावा, असा तर्क त्यांनी मांडला होता; मात्र त्याकाळी हाडांवर झालेल्या प्राणघातक जखमांचे पुरावे पेट्री मांडू शकले नव्हते. त्यामुळे गेल्या शंभर वर्षांपासून ‘मानवी बळी’च्या या सिद्धांतावर संशोधकांमध्ये वाद सुरू होता.
पेट्री यांनी बहुतांश अवशेष पुन्हा गाडले, परंतु ४६ कवट्या जतन करून केंब्रिज विद्यापीठातील ‘डकवर्थ कलेक्शन’मध्ये ठेवल्या होत्या. सोमवारी (५ ऑक्टोबर) ‘फंटियर्स इन एन्व्हायर्नमेंटल आर्किऑलॉजी’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात कॅम्पबेल यांनी आधुनिक फॉरेन्सिक (फॉरेन्सिक सायन्स) तंत्रज्ञानाचा आणि हाडांवरील दुखापतींच्या खुणांचा वापर करून या ४६ कवट्यांचा पुन्हा सखोल अभ्यास केला. कॅम्पबेल यांना ४६ पैकी १८ कवट्यांवर तीव्र प्राणघातक दुखापतींच्या खुणा आढळून आल्या आहेत. या दुखापतींवरून या व्यक्तींची हत्या करून त्यांचा बळी दिला गेला असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. विशेषतः अनेक कवट्यांवर रेषीय तडे आढळले आहेत, ज्यांना पुरातत्त्वशास्त्रज्ञ पेट्री यांनी दफनानंतर जमिनीच्या दाबामुळे झालेले नुकसान समजण्याची चूक केली होती.