खार्टूम : पूर्व सुदानमधील विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशात सॅटेलाईट रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आलेल्या एका मोठ्या संशोधनात महत्त्वपूर्ण यश आले आहे. खगोलशास्त्रीय सॅटेलाईट फोटोंच्या अचूक आणि पद्धतशीर अभ्यासातून सहारा वाळवंटाचा एक भाग असलेल्या ‘अतबाई वाळवंटात’ तब्बल 260 अज्ञात प्राचीन गोलाकार सामूहिक थडग्यांचा शोध लागला आहे.
‘आफ्रिकन आर्कियोलॉजिकल रिव्ह्यू’ या संशोधन पत्रिकेत हे नवे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियाची मॅक्वेरी युनिव्हर्सिटी, फ्रान्सचे ‘हायसोमा’ संशोधन केंद्र आणि पोलिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या संयुक्त पथकाने कोणतेही उत्खनन न करता केवळ सॅटेलाईट इमेजरीच्या आधारावर नाईल नदी आणि तांबडा समुद्र यांच्यामधील या वाळवंटाचा प्राचीन इतिहास उलगडला आहे. संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना वाळवंटात अनेक मोठी, गोलाकार सामूहिक थडगी आढळली. या थडग्यांच्या रचनेत एक विशेष पॅटर्न दिसून आला; यात मध्यभागी असलेल्या एका मुख्य व्यक्तीच्या मृतदेहाभोवती इतर मानवांचे आणि प्राण्यांचे सांगाडे अतिशय काळजीपूर्वक रचलेले होते.
इसवी सन पूर्व चौथ्या आणि तिसर्या सहस्रकात (म्हणजेच आजपासून सुमारे 5,000 ते 6,000 वर्षांपूर्वी) बांधल्या गेलेल्या या स्मारकांना ‘एन्क्लोजर ब्युरिअल’ म्हणतात. या थडग्यांभोवती एक मोठी गोलाकार भिंत असून, काहींचा व्यास चक्क 80 मीटर (262 फूट) पर्यंत आहे. या भिंतींच्या आत माणसांसह गायी, बैल, शेळ्या आणि मेंढ्या यांना एकत्र गाडण्यात आले आहे. नाईल नदीच्या पूर्वेला, जवळजवळ 1,000 किलोमीटरच्या वाळवंटी पट्ट्यात ही 260 नवी थडगी पसरलेली आहेत. यापूर्वी इजिप्त आणि सुदानच्या वाळवंटात अशी मोजकीच थडगी उत्खननात सापडली होती, ज्यामुळे संशोधक संभ—मात होते. मात्र, आता सॅटेलाईटद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, हा एखादा अपवाद नसून संपूर्ण वाळवंटात पसरलेली एक मोठी समान भटकी संस्कृती होती.
यातील बहुतांश थडगी सध्याच्या सुदान देशाच्या हद्दीत, ‘रेड सी हिल्स’च्या उतारावर आहेत. केवळ सॅटेलाईट चित्रांवरून या थडग्यांची संपूर्ण माहिती मिळवणे कठीण असले, तरी यापूर्वी उत्खनन झालेल्या काही थडग्यांमधील कार्बन डेटिंग आणि मातीची भांडी यांच्या अभ्यासावरून मोठा खुलासा झाला आहे. हे लोक इसवी सन पूर्व 4000 ते 3000 या काळात तिथे राहत होते. हा काळ इतिहासप्रसिद्ध ‘फॅरोनिक इजिप्त’ म्हणजेच इजिप्तमध्ये राजांची सत्ता स्थापन होण्यापूर्वीचा आहे. या शोधामुळे प्राचीन आफ्रिकेतील मानवी स्थलांतर आणि संस्कृती समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे.