चीनमध्ये 2,300 वर्षांपूर्वी बनला जगातील सर्वात जुना तारांगण नकाशा Pudhari File Photo
विश्वसंचार

चीनमध्ये 2,300 वर्षांपूर्वी बनला जगातील सर्वात जुना तारांगण नकाशा

संशोधकांनी आधुनिक डिजिटल इमेज प्रोसेसिंग तंत्र वापरून या ऐतिहासिक नकाशाचे विश्लेषण केले

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनमध्ये सुमारे इ.स.पू. 355 मध्ये तयार केलेला ‘स्टार मॅन्युअल ऑफ मास्टर शी’ (Master Shi) हा जगातील सर्वात प्राचीन तारांगण नकाशा ठरू शकतो, असा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, हा नकाशापूर्वी समजल्या गेलेल्या काळापेक्षा सुमारे 250 वर्षे जुना आहे.

चायनीज नॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीजमधील संशोधकांनी आधुनिक डिजिटल इमेज प्रोसेसिंग तंत्र वापरून या ऐतिहासिक नकाशाचे विश्लेषण केले. त्यांनी वापरलेली पद्धत Generalized Hough Transform ही संगणक द़ृष्टिकोनावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आहे, जी एकमेकांसारख्या प्रतिमांतील सूक्ष्म फरक शोधून त्यातील त्रुटी दूर करण्यात मदत करते. या विश्लेषणातून असे निष्पन्न झाले की, ‘स्टार मॅन्युअल ऑफ मास्टर शी’ इ.स.पू. 355 मध्ये लिहिले गेले आणि नंतर इ.स. 125 च्या सुमारास त्याचे अद्ययावत रूप तयार करण्यात आले. यामुळे हा नकाशा ग्रीक ज्योतिर्विद हिपार्कसच्या तार्‍यांच्या नकाशापेक्षा 200 वर्षांनी जुना ठरतो, जो यापूर्वी सर्वात प्राचीन समजला जात होता. ‘हा अभ्यास निर्णायक आहे,’ असं मत लेहाय युनिव्हर्सिटीचे प्रा. डेव्हिड पँकेनियर यांनी व्यक्त केलं.

ते चिनी खगोलशास्त्राचे तज्ज्ञ असून या संशोधनात सहभागी नव्हते. त्यांनी नमूद केलं की, हे संशोधन ब्रिटिश जैवरसायनतज्ज्ञ जोसेफ नीढॅम यांच्या आधीच्या कामाला पुष्टी देतं, ज्यांनी प्राचीन चिनी विज्ञानाच्या अभ्यासात मोलाची भर घातली होती. तथापि, काही तज्ज्ञ या निष्कर्षांवर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. ‘मास्टर शी’ च्या नकाशातील काही मोजमाप शेकडो वर्षे एकमेकांपासून वेगळी वाटतात, यामुळे इतिहासकार आणि खगोलशास्त्रज्ञ या नकाशाच्या तारखांबाबत गोंधळात आहेत. खगोलशास्त्रज्ञ तारांगण नकाशांचे वय ठरवू शकतात. कारण पृथ्वीच्या अक्षातील हालचालीमुळे (precession of the equinoxes) तार्‍यांच्या जागा शेकडो वर्षांत बदलतात. याशिवाय, तार्‍यांच्या स्वतःच्या गतीमुळे देखील काळाच्या ओघात आकाशगंगेचा नकाशा वेगळा दिसू शकतो. हा नवा अभ्यास प्राचीन चीनमधील खगोलविज्ञानाच्या प्रगततेचे एक महत्त्वाचे पुरावे समोर आणतो आणि जगातील प्रारंभिक वैज्ञानिक नकाशांकनाचा इतिहास नव्याने लिहिण्याची दिशा देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT