बोस्टन : पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी इजिप्तच्या गिझा येथील एका प्राचीन थडग्यातून मण्यांनी विणलेला एक अत्यंत देखणा आणि गुंतागुंतीचा पोशाख शोधून काढला आहे. हा पोशाख इजिप्तचा प्रसिद्ध राजा खुफू याच्या समकालीन असलेल्या एका स्त्रीचा असून, तो साधारणपणे इसवी सन पूर्व 27 व्या शतकातील म्हणजेच पाच हजार वर्षांपूर्वीच्या ‘ओल्ड किंगडम’मधील असल्याचे मानले जाते. इजिप्तच्या इतिहासात ‘ओल्ड किंगडम’चा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 2700 ते 2200 (म्हणजेच 27 वे शतक ते 22 वे शतक) मानला जातो.
1927 मध्ये शोध लागला तेव्हा या पोशाखाचे 7,000 मणी विखुरलेल्या अवस्थेत होते. कारण त्यांना एकत्र ठेवणारा लिनेनचा दोरा काळाच्या ओघात नष्ट झाला होता. मात्र, हे मणी ज्या ठिकाणी सापडले आणि प्राचीन इजिप्शियन कलेमध्ये अशा वस्त्रांचे जसे चित्रण आढळते, त्यावरून तज्ज्ञांनी या पोशाखाची अत्यंत कल्पकतेने पुनर्रचना केली आहे. म्युझियम ऑफ फाईन आर्टस्, बोस्टनकडे सध्या हा पोशाख सुरक्षित आहे. संग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा पोशाख लिनेनचा दोरा आणि ‘फायन्स’पासून बनवला आहे.
फायन्स म्हणजे बारीक कुटलेल्या क्वार्ट्जपासून बनवलेले झिलईदार कुंभारकाम होय. हे मणी भाजण्यापूर्वी फायन्सच्या मिश्रणात तांबे मिसळले गेले होते, ज्यामुळे त्यांना गडद निळा आणि हिरवट-निळा रंग प्राप्त झाला. हा रंग मुद्दाम ‘लॅपिस लाझुली’ आणि ‘फिरोजा’ यांसारख्या अत्यंत महागड्या रत्नांसारखा दिसावा यासाठी देण्यात आला होता. हा गुडघ्यापर्यंत लांब असलेला पोशाख विणकामाच्या जाळीसारखा दिसतो. यावर हिर्याच्या आकाराची नक्षी आहे. कमरेच्या वरच्या भागावर उभ्या मण्यांच्या ओळींची आकर्षक विणकाम आहे.
गळ्याभोवती मण्यांची वर्तुळाकार नक्षी असून, खालच्या बाजूला समुद्री शंख-शिंपल्यांची मोहक झालर लावण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा मण्यांचा जाळीदार पोशाख केवळ स्वतंत्रपणे न वापरता, बहुधा लिनेनच्या साध्या कापडी वस्त्रावर चढवला जात असावा किंवा त्यावर शिवला जात असावा. इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतील फॅशन आणि कारागिरीचा हा एक उत्कृष्ट पुरावा मानला जात आहे.