विश्वसंचार

जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या रूपातील एआय रोबो!

Arun Patil

बार्सिलोना : जगभरात अनेक प्रकारचे रोबो बनलेले आहेत. त्यामध्ये ह्युमनॉईड म्हणजेच मानवाकृती रोबोंपासून पशुपक्ष्यांच्या आकाराच्या रोबोंपर्यंत विविध प्रकारांचा समावेश आहे. यापूर्वी श्वानाच्या रूपातीलही रोबो बनले आहेत; पण ते यांत्रिक श्वान म्हणूनच समोर येतात. आता काहीसे जर्मन शेफर्ड श्वानासारखे रूप असलेला रोबो बनवण्यात आला आहे.

थोडा गोंडस, थोडा विचित्र आणि बराचसा खेळकर असे एखाद्या सामान्य पाळीव कुत्र्यामध्ये दिसणार्‍या सर्व गोष्टी ज्याच्यात दिसतात तो आहे हा डायनॅमिक 1! अर्थात डायनॅमिक हा काही खराखुरा कुत्रा नव्हे तर तो आहे जर्मन शेफर्डने प्रेरित असलेला 'टेक्नो'चा रोबोटिक कुत्रा! त्याच्या सर्व हालचाली अगदी आपल्या घरातीलच एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे आहेत. डायनॅमिक 1, 'टेक्नो' कंपनीच्या या रोबोटिक एआय कुत्र्याचे अनावरण बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रदर्शनात करण्यात आले.

'डायनॅमिक 1' हा जर्मन शेफर्डने प्रेरित असलेला कुत्रा हा खर्‍या कुत्र्यांच्या वर्तनाची नक्कल करण्यासाठी डिझाईन केलेला आहे.तो कुत्र्याच्या नैसर्गिक हालचालींची नक्कल करण्यासाठी अतिशय बारकाईने तयार केला गेला आहे. त्याच्या सर्व हालचाली जसे की डोके आणि शरीराची हालचाल, खेळकरपणा, अगदी नाचणेसुद्धा घरातील पाळीव प्राण्यांसारखेच आहे. 'टेक्नो'च्या मते, या हालचालींमधील अचूकता 'एआय हायपरसेन्स फ्यूजन सिस्टम' आणि '8-कोर एआरएम सीपीयू'च्या पॉवर्ड मोटर्सच्या सिंक्रोनाइझ केलेल्या सिस्टिमद्वारे मिळवली जाते.

रिअलसेन्स डी-430 डेप्थ कॅमेरा, ड्युअल ऑप्टिकल सेन्सर्स आणि इन्फ्रारेड सेन्सर्स सारख्या विविध सेन्सर्ससह सुसज्ज असा हा 'डायनॅमिक 1' त्याच्या सभोवतालचा परिसर प्रभावीपणे कॅप्चर करतो. याव्यतिरिक्त यात व्हॉईस कमांड ओळख अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी चार मायक्रोफोन आहेत. तूर्तास 'डायनॅमिक 1' 15,000 एमएएच बॅटरीवर अंदाजे 90 मिनिटांचा प्लेटाईम ऑफर करतो. 'डायनॅमिक 1' खरेदीसाठी उपलब्ध असेल की तो केवळ एआय आणि रोबोटिक्स कौशल्ये सुधारण्यासाठी एक चाचणी डिव्हाईस राहील याबद्दल 'टेक्नो'ने अद्याप माहिती दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT