Amur Falcon Migration | ‘अमूर ससाण्या’चा ४ दिवसांत मणिपूर ते सोमालिया प्रवास 
विश्वसंचार

Amur Falcon Migration | ‘अमूर ससाण्या’चा ४ दिवसांत मणिपूर ते सोमालिया प्रवास

तब्बल ५,७०० किमी न थांबता उड्डाण!

पुढारी वृत्तसेवा

मोगादिशू : निसर्गातील अद्‌भुत शक्तीचे दर्शन घडवत एका लहानशा ‘अमूर ससाण्याने’ ऐकायला अशक्य वाटणारा प्रवास पूर्ण केला आहे. अवघ्या १५० ग्रॅम वजनाच्या या पक्ष्याने भारतातील मणिपूरपासून पूर्व आफ्रिकेतील सोमालियापर्यंत तब्बल ५,७०० किलोमीटरचा पल्ला एकदाही न थांबता गाठला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात त्याने कुठेही विश्रांती घेतली नाही की अन्न-पाणी ग्रहण केले नाही.

मणिपूर ते सोमालिया असा विनाथांबा प्रवास करणाऱ्या या तरुण अमूर ससाण्याचे नाव ‘अलांग’ असे ठेवण्यात आले आहे. हे पक्षी वर्षानुवर्षे आशियातून आफ्रिकेकडे स्थलांतर करत आले आहेत, मात्र ‘अलांग’च्या उड्डाणाचा विशेष सॅटेलाईटद्वारे मागोवा (ट्रॅकिंग) घेण्यात आला. त्यातून हा थक्क करणारा उलगडा झाला आहे. अलांगने ५,७०० किलोमीटरचे हे अंतर १०१ तासांत (चार दिवसांपेक्षा थोडा अधिक वेळ) पूर्ण केले. पक्ष्यांच्या देखरेख अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केलेल्या ताज्या सॅटेलाईट-ट्रॅकिंग डेटानुसार, अलांगने भारतापासून थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत अखंड उड्डाण केले. अलांगचा साथीदार असलेला ‘अपापांग’ हा दुसरा अमूर ससाणाही अशाच विक्रमी उड्डाणाच्या जवळ पोहोचला आहे.

सुप्रिया साहू यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅकिंग डेटावरून अपापांगने ९५ तासांत ४,१०० किलोमीटरचे अंतर कापले असून, सध्या तो अरबी समुद्रावरून उड्डाण करत आहे. या दोन्ही पक्ष्यांनी मणिपूरमधील तामेंगलोंग जिल्ह्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. तत्पूर्वी ते सुमारे २५ दिवस तिथे मुक्कामी होते. अमूर ससाणे हे आकाराने लहान शिकारी पक्षी असून, त्यांचे वजन सुमारे १५० ग्रॅम असते. जगातील सर्वात लांबपल्ल्याचे आणि अद्‌भुत स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये त्यांची गणना होते. हे पक्षी दरवर्षी पूर्व रशिया, ईशान्य चीन आणि मंगोलियातील प्रजनन क्षेत्रांतून हिवाळा घालवण्यासाठी दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत जातात. या प्रवासादरम्यान ते ईशान्य भारतातून जातात.

मणिपूर आणि नागालँडमध्ये थांबून ते भरपूर कीटक खातात आणि पुढील खडतर प्रवासासाठी शरीरात ऊर्जा साठवतात. त्यांच्या प्रवासातील सर्वात कठीण टप्पा म्हणजे अरबी समुद्र ओलांडणे. या काळात हजारो किलोमीटरपर्यंत खाली उतरण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी त्यांच्याकडे जमिनीचा कोणताही पर्याय नसतो. मणिपूर अमूर फाल्कन ट्रॅकिंग प्रकल्पांतर्गत नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (WII) शास्त्रज्ञांनी अलांग आणि अपापांगच्या शरीरावर अत्यंत हलके सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवले होते. या पक्ष्यांचे स्थलांतराचे मार्ग ओळखणे आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किती वेळात व किती लांबवर उड्डाण करू शकतात, याचा अभ्यास करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT