वॉशिंग्टन : अमेरिकेतील योसेमाईट व्हॅलीतील 'फायरफॉल' या नावाने ओळखला जाणारा धबधबा नेहमी पर्यटकांचे आकर्षण बनलेला असतो. जणू काही ज्वालामुखीचा लाव्हारस डोंगरावरून खाली येत असावा असे त्याला पाहून वाटते. मात्र, हा तप्त लाव्हारस नसून तो साधा पाण्याचा धबधबाच आहे. मावळतीच्या सूर्याची किरणे धबधब्याच्या पाण्यावर पडली की असा आभास निर्माण होतो!
दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असे दृश्य पाहायला मिळते. योसेमाईट व्हॅलीमध्ये हा दोन हजार फूट उंचीचा धबधबा आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये हा 'फायरफॉल' पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते; पण यंदा कोरोना महामारीमुळे तिथे तुरळक पर्यटक आहेत. ऑनलाईन बुकिंगनंतर तिथे मोजक्याच पर्यटकांना प्रवेश दिला जातो. नॅशनल पार्क सर्व्हिसने म्हटले आहे की हा धबधबा हिवाळ्यात तसेच वसंत ऋतूत पाहण्यासारखा असतो. जर हवामान योग्य असले तर सूर्याची किरणे कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यावर पडून हा धबधबा नारंगी रंगात चमकू लागतो. दूरवरून पाहिल्यावर जणू काही तप्त रस पडत असल्यासारखे दृश्य दिसते.