Ambamata Devotees | अन्नपाण्याविना अनेक दशके जगलेले अंबामातेचे भक्त 
विश्वसंचार

Ambamata Devotees | अन्नपाण्याविना अनेक दशके जगलेले अंबामातेचे भक्त

वैद्यकीय तज्ज्ञही झाले होते चकित

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबाद : अन्नाचा एक घास किंवा पाण्याचा एक थेंबही न घेता एखादी व्यक्ती अनेक दशके कशी जगू शकते? हा प्रश्न ऐकल्यावर अंगावर काटा येतो आणि विज्ञानही यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. परंतु, गुजरातचे प्रल्हाद जानी ऊर्फ ‘चुनरीवाले माताजी’ यांनी तब्बल ७० वर्षांहून अधिक काळ अन्नाचा एक घास आणि पाण्याचा एक घोटही न घेता आयुष्य जगून संपूर्ण जगाला आणि वैद्यकीय क्षेत्राला अचंबित केले होते.

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील चराडा गावातील रहिवासी असलेले प्रल्हाद जानी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९२९ रोजी झाला होता. वयाच्या अवघ्या १० ते १२ व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि ते आध्यात्मिक मार्गावर निघून गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका आध्यात्मिक अनुभवानंतर त्यांना अंबामातेबद्दल अगाध भक्ती निर्माण झाली. देवीच्या भक्तीत ते नेहमी स्त्रीच्या वेशभूषेत राहत असत; लाल रंगाची चुनरी, अंगावर दागिने आणि केसांमध्ये फुले माळत असत. तेव्हापासून लोक त्यांना ‘चुनरीवाले माताजी’ किंवा ‘माताजी’ म्हणून ओळखू लागले. प्रल्हाद जानी यांचा असा ठाम विश्वास होता की, देवी अंबा त्यांना थेट योगशक्ती आणि दैवीय ऊर्जेद्वारे पोषण पुरवते, ज्यामुळे त्यांना कधीही भूक किंवा तहान लागत नाही. विशेष म्हणजे ते मल-मूत्र विसर्जनही करीत नसत.

प्रल्हाद जानी यांच्या या दाव्यामुळे जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर अचंबित झाले. त्यांच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी भारतात काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. २००३ मध्ये अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटल्सचे ख्यातनाम न्यूरोफिजिशियन डॉ. सुधीर शाह यांच्या नेतृत्वाखाली १० दिवस त्यांची कसून तपासणी करण्यात आली. त्यांना एका बंद खोलीत सीसीटीव्हीच्या कडक निगराणीखाली ठेवण्यात आले होते. या १० दिवसांत त्यांनी काहीही खाल्ले किंवा प्याले नाही, तसेच लघवी किंवा शौचही केले नाही, तरीही त्यांची प्रकृती पूर्णपणे निरोगी राहिली. २०१० च्या एप्रिल-मे मध्ये भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) अंतर्गत येणाऱ्या ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओलॉजी अँड अलाईड सायन्सेस’ (DIPAS) च्या ३५ शास्त्रज्ञांच्या पथकाने तब्बल १५ दिवस त्यांच्यावर काटेकोर नजर ठेवली. या काळातही त्यांनी नेहमीप्रमाणेच अन्न किंवा पाण्याशिवाय दिवस काढले.

डॉक्टरांच्या मते, मानवी शरीर सामान्यतः अन्न-पाण्याशिवाय काही दिवसच जगू शकते, परंतु जानी यांच्या बाबतीत हे नियम लागू होत नव्हते. वैज्ञानिकांच्या मते, ते योगसाधनेच्या माध्यमातून शरीराच्या चयापचय क्रिया नियंत्रित करत असावेत. अशा पद्धतीने ते अत्यंत सक्रिय दीर्घायुष्य जगले. आयुष्याची ९० वर्षे पूर्ण करणारे प्रल्हाद जानी यांनी २६ मे २०२० रोजी त्यांच्या मूळ गावी, चराडा येथे अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अंबाजी मंदिराच्या जवळ असलेल्या गब्बर हिलवरील त्यांच्या आश्रमात त्यांना समाधी देण्यात आली. अन्नाविना आणि पाण्याविना मानवी शरीर इतके दीर्घकाळ कसे टिकून राहू शकते, याचे गूढ विज्ञान आजवर पूर्णपणे उलगडू शकले नाही. अर्थात, भारतातील असे हे एकमेव उदाहरण नाही. परमहंस योगानंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात बंगालमधील ‘गिरीबाला’ या साध्वीची माहिती दिलेली आहे. त्या सुद्धा अशाच प्रकारे अन्न-पाण्याशिवाय सक्रिय जीवन जगत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT