Animal Survives without Food | अन्नाशिवाय ५ वर्षांहून अधिक काळ जगणारा अद्भुत जीव 
विश्वसंचार

Animal Survives without Food | अन्नाशिवाय ५ वर्षांहून अधिक काळ जगणारा अद्भुत जीव

पुढारी वृत्तसेवा

लंडन : समुद्राच्या अथांग आणि अंधाऱ्या खोलीत, जिथे अन्न मिळणे अत्यंत दुर्मीळ असते, तिथे एक असा जीव आढळतो जो तब्बल ५ वर्षांपेक्षा जास्त काळ अन्नाचा एक कणही न घेता जिवंत राहू शकतो. या जीवाला ‘डीप-सी इसोपॉड’ म्हटले जाते. नुकत्याच झालेल्या एका नवीन संशोधनात या जीवाच्या अद्भूत जगण्याच्या पद्धतीचा आणि त्याच्या जनुकीय (जेनेटिक) रहस्याचा उलगडा झाला आहे. हे संशोधन 'सेल' या प्रसिद्ध वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झाले आहे. चीनच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ ओशनॉलॉजी'चे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक जियानबो युआन यांच्या मते, ‘‘खोल समुद्रातील या इसोपॉडची जगण्याची रणनीती 'जास्त मिळवा आणि कमी खर्च करा' अशी आहे.’’

या जीवाच्या अद्भूत जगण्याची मुख्य कारणे

खोल समुद्रात राहणाऱ्या 'डीप-सी इसोपॉड' या जीवांचे पोट त्यांच्या शरीराच्या तब्बल दोन-तृतीयांश भाग व्यापते. त्यामुळे जेव्हा कधी त्यांना अन्न मिळते (जसे की वरून पडणारे मृत जीव किंवा सेंद्रिय कचरा), तेव्हा ते प्रचंड प्रमाणात अन्न खाऊन घेतात. हे पोट एखाद्या गोदामासारखे काम करते. अन्न साठवल्यानंतर हा जीव एका प्रकारे 'स्टँडबाय मोड'वर जातो. त्यांची चयापचय क्रिया, पचनशक्ती अत्यंत मंद होते आणि पोषक तत्त्वांचा वापर अत्यंत कार्यक्षमतेने केला जातो. यामुळे एका वेळचे जेवण त्यांना अनेक वर्षे ऊर्जा पुरवू शकते.

बॅक्टेरियल जनुकाचे ‘हायजॅकिंग’

संशोधनातील सर्वात मोठा खुलासा म्हणजे, या जीवाच्या शरीरात ‘एनडी१’ नावाचे एक जनुक (जीन) आढळले आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी एका जिवाणू (बॅक्‍टेरिया) कडून 'हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर'द्वारे हे जनुक या जीवाच्या स्वतःच्या जनुकीय रचनेत समाविष्ट झाले आहे. हे जनुक थंड वातावरणात ऊर्जा वाचवण्याचे काम करते आणि एका 'मेटाबॉलिक स्विच'सारखे काम करून शरीराची ऊर्जा नियंत्रित करते. या जीवाच्या पोटात 'क्लॅमिडीया' नावाचे बॅक्टेरिया राहतात, जे शरीरात चरबी (फॅट) साठवण्यास मदत करतात. या बदल्यात जीवाणूंना सुरक्षित घर मिळते आणि इसोपॉडला गरजेच्या वेळी हळूहळू ऊर्जा मिळत राहते. 'डीप-सी इसोपॉड' हे जीव दिसायला बागेतील छोट्या 'पिल बग'सारखे दिसतात, परंतु आकाराने खूप मोठे असतात. त्यांची लांबी अर्ध्या मीटरपेक्षा (२० इंच) जास्त असू शकते. त्यांना १४ पाय आणि कडक कवच असते. हे प्रामुख्याने अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागराच्या ३०० ते ९०० मीटर किंवा त्याहून अधिक खोलीवर आढळतात. धोक्याचा इशारा मिळताच ते स्वतःला एखाद्या चेंडूच्या आकारात गुंडाळून घेतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT