वॉशिंग्टन : व्हर्मंटमधील खगोल छायाचित्रकार मिशेल हर्नांदेज बेयलिस यांनी आकाशातील दोन भव्य आकाशगंगांचे नेत्रदीपक छायाचित्रण केले आहे. मेसिअर 94 ( Messier 94) किंवा क्रोक्स आय गॅलेक्सी म्हणून ओळखली जाणारी आकाशगंगा आणि प्रसिद्ध व्हर्लपूल गॅलेक्सी ( Messier 51) यांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही आकाशगंगा उरपशी Canes Venatici या तारकासंस्थेमध्ये स्थित आहेत.
मेसिअर 94 चे छायाचित्रण 20 आणि 21 एप्रिलच्या रात्रींदरम्यान करण्यात आले. यासाठी Takahashi TOA-130 NFB Refractor आणि Stellarvue SVX140 T- R telescope यांचा वापर केला गेला, तसेच खोल आकाशातील तपशील टिपण्यासाठी आवश्यक इतर अनेक उपकरणेही वापरली गेली.
या काळात हर्नांदेज बेयलिस यांनी ल्यूमिनन्स, रेड, ग्रीन आणि ब्लू (LRGB) फिल्टर वापरून च94 चे सखोल डेटा गोळा केला आणि नंतर सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्याचे एकत्रिकरण करून एक सुंदर सर्पिल आकाशगंगेचे चित्र तयार केले. ही आकाशगंगा आपल्या सौरमालेपासून 34 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे. ‘आकाशगंगा कॅमेरामध्ये अपेक्षेपेक्षा खूपच लहान वाटली,’ असं हर्नांदेज बेयलिस यांनी सांगितलं. ‘त्यामुळे मला थोडं ‘क्रॉप’ करावं लागलं. आणि गॅलेक्सीचा मध्यभाग खूपच तेजस्वी असल्याने HDR कॉम्प्रेशन करून तो भाग नीट उभारावा लागला,’ असं त्यांनी सांगितलं.
फेब्रुवारी महिन्यात, बेयलिस यांनी व्हर्लपूल गॅलेक्सी (Messier 51) चेही सुंदर छायाचित्र घेतले. त्यासाठी त्यांनी RGB आणि हायड्रोजन-अल्फा (Ha) फिल्टर्स वापरले आणि आकाशगंगेची बारीक-सारीक रचना टिपली. मिशेल हर्नांदेज बेयलिस याआधी द़ृश्य खगोलशास्त्रात गुंतलेल्या होत्या; पण मागील काही वर्षांत त्यांनी खगोल छायाचित्रण सुरू केलं. गेली दोन वर्षं त्यांनी वेम्ब्रिज, व्हर्माँट येथे स्वतःच्या घरी एक वेधशाळा उभारली आहे. ‘व्हर्माँटमध्ये स्वच्छ, चंद्रविरहित आकाश खूप कमी वेळा मिळतं, त्यामुळे सलग दोन रात्री ढगांशिवाय, चंद्राशिवाय स्वच्छ आकाश मिळणं म्हणजे खरंच एखादं चमत्कारच,’ असं त्यांनी आनंदाने सांगितलं.