बीजिंग : वाढत्या वयानुसार विस्मरणाचा आजार म्हणजेच ‘अल्झायमर’चा धोका वाढतो. मात्र, आता एका नवीन संशोधनामुळे या आजारावर स्वस्त आणि सुरक्षित उपचार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकवल्याने मेंदूतील हानिकारक प्रथिनांचा कचरा साफ होण्यास मदत होऊ शकते.
मानवी वयानुसार मेंदूमध्ये ‘बीटा-अमाइलॉईड’ नावाचे एक हानिकारक प्रथिन जमा होऊ लागते. हे प्रथिन मेंदूच्या पेशींवर एक थर किंवा ‘प्लाक’ तयार करते, ज्यामुळे पेशींचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटतो आणि माणसाची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. यालाच आपण ‘अल्झायमर’ म्हणतो. ‘प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, चीनमधील कुनमिंग इन्स्टिट्यूट ऑफ झूलॉजीच्या शास्त्रज्ञांनी 9 वृद्ध माकडांवर एक प्रयोग केला. त्यांना एक आठवडा दररोज एक तास ‘40 हर्टझ्’ (40 Hz) वारंवारतेचे आवाज ऐकवण्यात आले.
हा आवाज ऐकवल्यानंतर माकडांच्या मेंदूतील द्रव पदार्थामध्ये (Cerebrospinal fluid) हानिकारक प्रथिनांचे प्रमाण 200 टक्क्यांनी वाढलेले आढळले. याचा अर्थ असा की, या आवाजामुळे मेंदूतील पेशींवरील विषारी कचरा वेगाने बाहेर फेकला जात होता. विशेष म्हणजे, आवाज ऐकवणे बंद केल्यानंतरही पुढील 5 आठवडे मेंदूची ही सफाई प्रक्रिया सुरूच होती. आपल्या मेंदूचे कार्य ठरावीक लयीवर चालते. अल्झायमरमध्ये ही लय बिघडते. शास्त्रज्ञांच्या मते, 40 हर्टझ्ची साऊंड थेरपी मेंदूची ही बिघडलेली लय पुन्हा पूर्वपदावर आणते, ज्यामुळे मेंदूच्या ‘क्लिनिंग सिस्टम’ला आपला कचरा कधी आणि कसा साफ करायचा, याचे संकेत मिळतात. संशोधनाचे निकाल उत्साहवर्धक असले, तरी तज्ज्ञ सध्या सावधगिरीचा इशारा देत आहेत.
1. मर्यादित संशोधन : कॅटालोनियामधील प्रोफेसर ग्यूसेप बटाग्लिया यांच्या मते, हे संशोधन छोट्या स्तरावर झाले आहे. माकडांवर परिणाम झाला म्हणजे माणसांवरही तसाच होईल, असे लगेच म्हणता येणार नाही.
2. इंटरनेटवरील संगीत : सध्या इंटरनेटवर 40 हर्ट्झचे संगीत सहज उपलब्ध आहे. ते कमी आवाजात ऐकण्याने नुकसान नसले, तरी उपचाराच्या द़ृष्टीने त्याचे फायदे अद्याप सिद्ध झालेले नाहीत. लॅबमध्ये वापरल्या जाणार्या आवाजाची तीव्रता आणि रचना अतिशय अचूक असते. जगभरात सुमारे 5.5 कोटी लोक अल्झायमरशी झुंज देत आहेत आणि सध्या त्यावर कोणताही कायमस्वरूपी इलाज नाही. अशा परिस्थितीत, ही साऊंड थेरपी भविष्यात एक अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित उपचाराचा मार्ग ठरू शकते.