मार्सेले : जगभरात अनेक प्रकारचे अजब डिशेस आढळून येतात. काही ठिकाणी अगदी खराब पनीर वेचून ते व्यंजनात वापरले जाते तर काही ठिकाणी अगदी ठिसूळ स्वरूपाचे दगड फ्राय करून खाण्याचीही परंपरा आहे. मात्र, जगात एक थाळीही अशीही आहे, ज्याला पापाची थाळी असे संबोधले जाते आणि ती थाळी खाताना चक्क चेहरा झाकून घेण्याची अजब प्रथा आहे. फ्रान्समधील विविध भागांत ही प्रथा आजही जोपासली जाते.
फ्रान्समध्ये ओर्टोलॅन बंटिंग नावाचा एक पक्षी असतो. या पक्षाच्या मांसापासून केलेली डिश लोक आपला चेहरा कपड्याने झाकून घेऊन खातात. याला पापाची थाळी, असे म्हटले जाते. युरोपमधील अनेक देशांमध्ये या पक्षाचे मांस खाण्यावर बंदी लादली गेली आहे. अगदी फ्रान्समध्येदेखील ही बंदी लागू आहे. पण, आजही तेथे या पक्षाचे मांस आहारात घेतले जाते आणि ती थाळी खाताना चेहरा झाकून घेतला जातो.
हे पक्षी दरवर्षी शरद ऋ तूत आफ्रि केच्या दिशेने स्थलांतरित होतात. त्याचवेळी शिकारी हे सावज टिपतात. या पक्षांची शिकार क्रूरतेने केली जाते. मात्र, त्यापूर्वी त्यांचे वजन वाढावे, यासाठी त्यांना अधिक खाण्याचे पदार्थ दिले जातात. त्यानंतर त्यांचा बळी देत डिश तयार केली जाते. ही डिश खाताना आपल्याला कोणी पाहू नये, या विचाराने चेहरा झाकून ती खाण्याची पद्धत सुरू झाल्याचे फ्रान्समध्ये मानले जाते.