नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या संध्याकाळनंतर जेव्हा रात्र होते, तेव्हा शेतांमध्ये, बागांमध्ये किंवा नद्यांच्या काठी छोटे-छोटे काजवे चमकताना दिसतात. हे द़ृश्य खूप जादुई वाटते, जणू काही आकाशातील तारेच जमिनीवर उतरले आहेत; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे छोटेसे कीटक फक्त रात्रीच का चमकतात? काजवे त्यांच्या शरीरात प्रकाश कसा निर्माण करतात, ज्यामुळे ते चमकताना दिसतात? खरं तर, यामागे निसर्गाचा वैज्ञानिक आविष्कार आहे. चला, यामागचं कारण जाणून घेऊया.
काजवे चमकण्याच्या या घटनेला विज्ञानाच्या भाषेत ‘बायोलुमिनिसेंस’ (Bioluminescence) म्हणतात. याचा अर्थ, एखाद्या सजीव प्राण्यामध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे प्रकाश निर्माण करणे. काजव्याच्या पोटाच्या खालच्या भागात एक विशेष अवयव असतो. या अवयवामध्ये ल्यूसिफेरिन आणि ल्यूसिफेरेज ही दोन महत्त्वाची रसायने असतात. जेव्हा काजवा श्वास घेतो, तेव्हा ऑक्सिजन या रसायनांसोबत मिसळतो आणि एक रासायनिक अभिक्रिया घडते.
या अभिक्रियेमुळे ऊर्जा बाहेर पडते, जी प्रकाशाच्या रूपात दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या प्रक्रियेत अत्यंत कमी उष्णता निर्माण होते, म्हणून या प्रकाशाला ‘थंड प्रकाश’ (Cold Light) असेही म्हणतात. आता प्रश्न असा आहे की, हा प्रकाश फक्त रात्रीच का दिसतो? यामागे काजव्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट दडलेले आहे - प्रजनन आणि संवाद. जोडीदाराला आकर्षित करणे - रात्रीचा अंधार काजव्यांसाठी एक परिपूर्ण रंगमंच आहे. काजव्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींचा स्वतःचा असा एक चमचमण्याचा वेग असतो.
नर काजवे उडून या वेगाने प्रकाशाचे संकेत पाठवतात. दूर बसलेली मादी काजवा हा ‘कोड’ ओळखते आणि त्याच पॅटर्नमध्ये प्रतिसाद देते. अशा प्रकारे, ते अंधारातही एकमेकांना शोधून काढतात. दिवसाच्या उजेडात त्यांचा प्रकाश दिसत नाही, म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया रात्रीच शक्य आहे. स्व-संरक्षण - काजव्यांचा हा प्रकाश त्यांच्या संरक्षणासाठीही उपयोगी येतो. हा चमकदार संकेत त्यांच्यासाठी एक चेतावणी असतो. काजव्याच्या शरीरात काही अशी रसायने असतात, ज्यामुळे ते विषारी किंवा बेचव वाटतात. पक्षी किंवा बेडकांसारखे शिकारी हा प्रकाश पाहून त्यांच्यापासून दूर राहतात.