गुईलिन : जगात एक असे गाव आहे जिथे प्रत्येक महिलेचे केस 6-7 फूट लांब असतात. या महिला आयुष्यात फक्त एकदाच केस कापतात. या परंपरेमागचे कारण जाणून आश्चर्य वाटेल. चीनच्या दक्षिणेकडील गुईलिन नावाचे एक शहर आहे. इथून 2 तासांच्या अंतरावर हुआंग्लुओ नावाचे एक गाव आहे. सुरुवातीला हे एक सामान्य गाव वाटेल; पण इथल्या महिलांना पाहता, तेव्हा आश्चर्य वाटेल. कारण इथल्या महिलांचे केस त्यांच्या उंचीपेक्षाही जास्त लांब असतात. या महिलांचे केस 4 फुटांपेक्षा जास्त लांब असणे सामान्य आहे. अनेकींचे केस 6 फूट लांब असतात आणि 2004 मध्ये एका महिलेच्या केसांची लांबी 7 फूट मोजली गेली होती.
या महिलांच्या केसांचे वजन 1 किलोपर्यंत असते. हे याओ जमातीचे लोक आहेत आणि त्यांच्या महिला आपले केस लांब ठेवतात. त्या आयुष्यात फक्त एकदाच केस कापतात. तो काळही एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. जेव्हा त्या 17-18 वर्षांच्या असतात तेव्हा त्या केस कापतात. त्यानंतर त्या कधीच केस कापत नाहीत. आपले केस लांब आणि जाड ठेवण्यासाठी त्यांना त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. त्या स्वतः एक खास प्रकारचे शाम्पू बनवतात. चहा, फर आणि इतर अनेक औषधी वनस्पतींचाही त्यात वापर केला जातो.
आता आम्ही तुम्हाला केस लांब ठेवण्यामागचे कारण सांगतो. त्या आपल्या पूर्वजांच्या आदराने हे केस वाढवतात. त्यांचा असा विश्वास आहे की, केस हे पूर्वजांशी संवाद साधण्याचे माध्यम आहे. त्यामुळे त्या आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी कधीच केस कापत नाहीत. ज्या महिलांचे लग्न झालेले नाही, त्या आपले केस स्कार्फने बांधून ठेवतात, तर विवाहित महिला डोक्याच्या समोरच्या बाजूला अंबाडा बांधतात. याओ महिलांचा नृत्यही अनेकदा चर्चेचा विषय असतो. त्यांची संस्कृती पाहण्यासाठी अनेक पर्यटक त्यांच्या गावाला भेट देतात.