विश्वसंचार

परग्रहवासीयांचा पृथ्वीवर वावर; अमेरिका, इस्रायलला आहे ठाऊक!

Pudhari News

तेल अवीव :

अंतराळाच्या या अनंत पसार्‍यात केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी किंवा मानवासारखे प्रगत जीव आहेत, असे म्हणणे हे कूपमंडूक वृत्तीचेच लक्षण आहे. मात्र, अद्यापही आपल्या सौरमालिकेत किंवा तिच्या बाहेर परग्रहवासीयांची तसेच सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टीच्या अस्तित्वाची ठोस माहिती मिळालेली नाही. तरीही परग्रहवासीयांचे अस्तित्व असून, ते वेळोवेळी उडत्या तबकड्या म्हणजेच 'युफो'मधून पृथ्वीला भेट देत असतात, असे म्हटले जाते. आता इस्रायलच्या अंतराळ सुरक्षा मोहिमेच्या माजी प्रमुखांनी याबाबत भन्‍नाट दावा केला आहे. परग्रहवासीयांचा पृथ्वीवर गुप्‍त वावर असून, आपल्या अस्तित्वाची माहिती सध्या तरी गुप्‍तच ठेवावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांच्या अंतराळातील फेडरेशनने अमेरिका व इस्रायलशीही करार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हाईम अशद असे या इस्रायली अंतराळ तज्ज्ञांचे नाव आहे. त्यांनी इस्रायलमधील 'यडीओथ अहरोनोथ' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. त्यांचे वय 87 असून, ते 1981 ते 2010 या सुमारे तीस वर्षांच्या काळात इस्रायलच्या अंतराळ सुरक्षा मोहिमेचे प्रमुख होते. त्यांनी म्हटले आहे की, एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांनी अमेरिकेसोबत करार केला आहे. पृथ्वीवर एलियन्सकडून केल्या जाणार्‍या प्रयोगांबाबत अमेरिकेला कल्पना असून, या करारामुळे अमेरिका यावर मौनच बाळगून आहे. या एलियन्सचा मंगळ ग्रहावर एक गुप्‍त तळ असून, जोपर्यंत मानव या एलियन्सना स्वीकारण्यासाठी तयार होत नाहीत, तोपर्यंत याबाबतचा खुलासा केला जाणार नाही. 'आपला पृथ्वीवर वावर आहे यासंदर्भातील घोषणा करू नये,' असे एलियन्सनी म्हटले आहे. एलियन्सना स्वीकारण्यासाठी मानव अजून मानसिकद‍ृष्ट्या तयार झालेला नसल्याने आपला वावर गुप्‍तच ठेवण्याचा निर्णय एलियन्सनी घेतला आहे. अशद यांनी 'गॅलेक्टिक फेडरेशन' या आकाशगंगेतील एलियन्सच्या संस्थेचाही उल्‍लेख केला आहे. 'अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एलियन्सच्या अस्तित्वासंदर्भात खुलासा करणारच होते. मात्र, गॅलेक्टिक फेडरेशनने त्यांना रोखले. लोकांना जरा शांत होऊ द्या, असे फेडरेशनने त्यांना म्हटले,' असेही अशद यांनी सांगितले. एलियन्सनी आपले अस्तित्व लपवून ठेवण्यासाठी अमेरिकेबरोबरच इस्रायलशीही करार केल्याचे त्यांनी सांगितले. मंगळाच्या पृष्ठभागाखाली एलियन्सचा एक तळ असून, तिथे त्यांचे प्रतिनिधी आणि अमेरिकेचे अंतराळवीरही आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. अर्थात, इस्रायलमधीलच अनेक प्रसिद्धी माध्यमांनी अशद यांचे दावे अतिरंजित असल्याचे म्हटले आहे!

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT