वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही, हे अद्याप विज्ञानाने स्पष्ट केलेले नसले तरी त्यांच्याबाबत सातत्याने दावे केले जात असतात. हे एलियन्स वेळोवेळी आपल्या यानांमधून पृथ्वीला भेट देत असतात असे म्हटले जाते. आता तर अमेरिकेतील एक प्राध्यापक डॉ. डेव्हिड जेकब्स यांनी म्हटले आहे की, पृथ्वीवर परग्रहांवरून आलेले एलियन्स राहात आहेत. ते माणसांचे अपहरण करीत आहेत, इतकेच नव्हे तर ते पृथ्वीवर हल्ला करण्याच्याही तयारीत आहेत!
डॉ. जेकब्स यांनी दावा केला आहे की, त्यांनी एलियन्सच्या हल्ल्यातून बचावलेल्या अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. एलियन्सनी केलेल्या अपहरणाबाबत त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. प्रा. जेकब्स हे अमेरिकेच्या टेम्पल युनिव्हर्सिटीत अध्यापन करतात व ते 'युफो' म्हणजेच 'उडत्या तबकड्यां'च्या प्रकरणांबाबतचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी आता आपले संशोधन एका लघुपटाच्या माध्यमातून समोर आणले आहे. त्यांनी काढलेले निष्कर्ष आश्चर्यकारक तसेच भयावह आहेत. त्यांनी दावा केला आहे की, एलियन्स पृथ्वीवर कब्जा करण्याच्या तयारीत आहेत. माणसांच्या अपहरणांच्या कथित घटनांवरून त्यांनी असे निष्कर्ष काढले आहेत.
एलियन्स माणसाच्या मेंदूवरही कब्जा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, आपण संपूर्ण जगभर विखुरलेलो आहोत आणि जितका विजय मिळवायचा तितका आपण मिळवलेला आहे. मला वाटते की, एलियन्सही असेच करीत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अपहरण केलेल्या अनेक लोकांनी सांगितले की, त्यांना एकसारखाच संदेश मिळाला होता.