Alien Radio Signals | एलियन्सच्या रेडिओ सिग्नल मार्गात कशामुळे अडथळा ? 
विश्वसंचार

Alien Radio Signals | एलियन्सच्या रेडिओ सिग्नल मार्गात कशामुळे अडथळा ?

परग्रहावरील ‘स्पेस वेदर’ कारणीभूत असल्याचा संशोधकांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : गेल्या अनेक दशकांपासून मानव विश्वातील इतर ताऱ्यांकडे पाहत एलियन्सच्या (परग्रहवासी) रेडिओ सिग्नलचा शोध घेत आहे. परंतु, आतापर्यंत तरी 'ई.टी.' कडून कोणताही संपर्क झालेला नाही. मात्र, याचा अर्थ असा मुळीच नाही की विश्वात बुद्धिमान जीवसृष्टी अस्तित्वात नाही. एका नव्या संशोधनातून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, परग्रहाभोवती असणारे 'स्पेस वेदर' (अंतराळातील हवामान) आपल्याला इतर ग्रहांवरील प्रगत संस्कृतींचे तांत्रिक सिग्नल (technological signals) शोधण्यापासून रोखत असण्याची शक्यता आहे.

'द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल' मध्ये ५ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाने प्रसिद्ध 'फर्मी पॅराडॉक्स' चे संभाव्य उत्तर दिले आहे. हे फर्मी पॅराडॉक्स काय आहे ? १९५० मध्ये भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी यांनी एक प्रसिद्ध प्रश्न विचारला होता : "सगळे कुठे आहेत?" विश्वाचा अथांग आकार पाहता, तिथे जीवन जगण्यास अनुकूल असे लाखो ग्रह असू शकतात. तरीही आजपर्यंत आपल्याला कोणत्याही परग्रहावरून तांत्रिक खाणाखुणा मिळालेल्या नाहीत. या विरोधाभासालाच 'फर्मी पॅराडॉक्स' म्हटले जाते. या नव्या संशोधनानुसार, एखाद्या ग्रहाच्या ताऱ्यामुळे (सूर्य) निर्माण होणारे स्पेस वेदर हे परग्रहवासीयांच्या काल्पनिक तांत्रिक सिग्नलचा विस्तार करते. यामुळे त्या सिग्नलची ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजमध्ये (वारंवारता) विखुरली जाते आणि ते शोधणे अत्यंत कठीण होते.

'सेटी' (SETI - Search for Extraterrestrial Intelligence) संस्थेचे खगोलशास्त्रज्ञ आणि या संशोधन पत्रिकेचे मुख्य लेखक विशाल गज्जर यांनी एका निवेदनात सांगितले की: "जर एखादा सिग्नल त्याच्या स्वतःच्या ताऱ्याच्या वातावरणामुळे विखुरला गेला, तर तो तिथे असूनही आमच्या शोध यंत्रणेच्या क्षमतेपेक्षा कमकुवत होतो. तंत्रज्ञानाच्या शोधात आपल्याला आतापर्यंत जे 'रेडिओ सायलेन्स' (शांतता) अनुभवायला मिळाले आहे, त्यामागील कारण कदाचित हे असू शकते." खगोलशास्त्रज्ञ परग्रहावरील जीवांचा शोध घेण्यासाठी प्रामुख्याने 'नॅरोबँड सिग्नल्स' चा वापर करतात.

हे सिग्नल रेडिओ उत्सर्जनातील अतिशय तीक्ष्ण आणि मर्यादित (काही हर्ट्झ पुरतेच) असतात. या संशोधनात समाविष्ट नसलेले ट्रिनिटी कॉलेज डब्लिनचे खगोलशास्त्रज्ञ इव्हान कीन यांनी सांगितले की, "असे सिग्नल्स निसर्गात आपोआप तयार होत नाहीत. त्यामुळे जर आपल्याला असा एखादा अतिशय मर्यादित नॅरोबँड सिग्नल दिसला, तर तो नक्कीच काहीतरी महत्त्वाचा किंवा कृत्रिम आहे हे समजते." उदाहरणार्थ, मंगळ ग्रहावर असलेल्या मानवनिर्मित रोव्हर्सकडून येणारे नॅरोबँड सिग्नल्स शास्त्रज्ञ सहज शोधू शकतात. मात्र, मानवा व्यतिरिक्त इतर कोणत्याही परग्रहावरील संस्कृतीकडून अद्याप असा स्पष्ट सिग्नल मिळालेला नाही, ज्याच्या मागे आता 'स्पेस वेदर' कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT