Milky Way stars discovery | आकाशगंगेत आढळले ‘परक्या’ जगातील तारे 
विश्वसंचार

Milky Way stars discovery | आकाशगंगेत आढळले ‘परक्या’ जगातील तारे

10 अब्ज वर्षांपूर्वीच्या विलीनीकरणाचा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेत (मिल्की वे) काही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण तार्‍यांचा शोध लावला आहे. हे तारे एकेकाळी एका वेगळ्या आकाशगंगेचा भाग असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे. या तार्‍यांच्या रासायनिक रचनेचा आणि त्यांच्या हालचालींचा अभ्यास केल्यानंतर, संशोधकांनी या ‘घरबाह्य’ आकाशगंगेला ‘लोकी’ असे टोपणनाव दिले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक फेडेरिको सेस्टिटो यांच्या मते, ‘लोकी’ ही आकाशगंगा साधारण 10 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या आकाशगंगेत विलीन झाली असावी. सेस्टिटो यांनी स्पष्ट केले की, विश्वाच्या सुरुवातीच्या काळात निर्माण झालेल्या पहिल्या काही लहान आकाशगंगांपैकी ‘लोकी’ एक असू शकते. विशाल आकाशगंगा या जन्मतःच मोठ्या नसतात. अब्जावधी वर्षांच्या प्रवासात लहान आकाशगंगा एकमेकांत मिसळून किंवा मोठ्या आकाशगंगेने लहान आकाशगंगेला गिळंकृत केल्यामुळे त्यांचे विशाल स्वरूप तयार होते.

‘बिग बँग’नंतर वायूचे ढग एकत्र येऊन पहिल्या आदिम आकाशगंगा तयार झाल्या, ज्या पुढे एकमेकांत मिसळून आजच्या महाकाय संरचना बनल्या आहेत. ‘मंथली नोटीसेस ऑफ द रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’मध्ये 23 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात, शास्त्रज्ञांनी 20 अतिशय जुन्या तार्‍यांची ओळख पटवली आहे. हे तारे ‘मेटल-पुअर’ (धातूंचे प्रमाण अत्यंत कमी असलेले) आहेत आणि ते आकाशगंगेच्या चकतीजवळ फिरत आहेत.

हे तारे खास का आहेत?

मूलद्रव्यांचा इतिहास : विश्वातील पहिले तारे केवळ हायड्रोजन आणि हेलियमपासून बनले होते. या तार्‍यांच्या उद्रेकानंतर त्यातून जड मूलद्रव्ये (ज्याला खगोलशास्त्रज्ञ ‘मेटल्स’ म्हणतात) बाहेर पडली. त्यामुळे तार्‍यांच्या प्रत्येक पुढच्या पिढीत धातूंचे प्रमाण वाढत गेले.

स्थानाचे महत्त्व : संगणकीय सिम्युलेशननुसार, जे तारे आकाशगंगेच्या केंद्राच्या अधिक जवळ आढळतात, ते सर्वात जुन्या विलीनीकरणाचा भाग असतात. याउलट, उशिरा विलीन झालेल्या आकाशगंगांचे तारे आकाशगंगेच्या बाहेरील कडेला विखुरलेले असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT