बीजिंग : ज्याप्रमाणे वैज्ञानिकांना एखाद्या परग्रहावरील ‘एलियन’ने संदेश पाठवला; पण त्या संदेशातील भाषा, व्याकरण पृथ्वीवरील लोकांना समजणे कठीण आहे, तशीच काहीशी अवस्था इंटर-युनिव्हर्सल थिअरी (IUT) च्या बाबतीत गणितज्ज्ञांची झाली आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शिनीची मोचिझुकी यांनी सुमारे एक दशकापूर्वी हा सिद्धांत मांडला, जो ABC conjecture (अंक सिद्धांत) सोडवण्याचा प्रयत्न करत होता. हा सिद्धांत इतका वेगळा आहे की, याला ‘एलियनची भाषा’ असे नाव देण्यात आले आहे. जगातील फक्त 20 लोकांनाच तो थोडाफार समजला आहे. आता, झोऊ झोंगपेंग नावाच्या 28 वर्षीय अभियंत्याने IUT ला सोपे करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.
मोचिजुकी यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला IUT विकसित केले आणि 2012 मध्ये चार प्रीप्रिंटस्च्या मालिकेत ते प्रकाशित केले. हा सिद्धांत 2,000 पानांपेक्षा जास्त लांब आहे आणि मोचिजुकीचा दावा आहे की, ते ABC conjecture चे समाधान देते. जर हे सिद्ध झाले तर Fermat' s Last Theorem सारख्या इतर मोठ्या गणितीय समस्या स्पष्ट करण्यात मदत करू शकते. IUT मध्ये गणिताच्या जगात पूर्णपणे अद्वितीय संकल्पना आणि चिन्हे वापरली आहेत. दुसर्या शब्दांत, मोचिजुकीने स्वतःची गणितीय भाषा तयार केली आहे आणि त्यामुळे जगातील अनेक आघाडीचे गणितज्ज्ञ गोंधळले आहेत.
इव्हान फेसेन्को यांसारख्या काही धाडसी लोकांनी त्याचा काही भाग उलगडण्याचा प्रयत्न केला आहे आणि मोचिजुकीच्या दाव्यांना काही प्रमाणात सत्यता दिली आहे. तरीही एक दशक होऊनही, IUT चे पूर्णपणे परीक्षण झालेले नाही. कारण, ते समजायला खूप कठीण आहे. झोऊ यांनी ग्राफ थिअरीमध्ये डॉक्टरेट केली आहे. परंतु, त्यांनी पदवी पूर्ण करण्यापूर्वीच सोडून सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र, त्यांची गणितातील आवड कमी झाली नाही. IUT चा अभ्यास करत त्यांनी पाच महिन्यांत अनेक सुधारणा आणि नवीन उपाय योजना एका पेपरमध्ये सादर केल्या, जे मोचिजुकी आणि फेसेन्को दोघांनाही पाठवले. हे काम बरोबर असेल, तर ते IUT च्या तत्त्वांचा वापर करून Fermat' s Last Theorem चे बहुतेक भाग सिद्ध करते.