महासागराच्या तळाशी एलियन्सचा अड्डा? Pudhari File Photo
विश्वसंचार

महासागराच्या तळाशी एलियन्सचा अड्डा?

अमेरिकन खासदाराचा दावा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजेच परग्रहवासी आहेत की नाहीत याबाबत विज्ञानाने अद्याप मौनच बाळगले आहे; मात्र त्याबाबतचे संशोधन सातत्याने सुरू असते. अंतराळाच्या या अनंत पसार्‍यात केवळ पृथ्वी नामक ग्रहावरच जीवसृष्टी असेल, असे कुणालाही पटणार नाही; मात्र अद्याप पृथ्वीशिवाय अन्य ग्रहांवर एलियन्सचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले नाही, हेही खरेच आहे. त्याबाबतचे दावे मात्र सातत्याने केले जात असतात. आता अमेरिकेतील एका रिपब्लिकन खासदाराने केलेल्या वक्तव्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींपैकी एक असलेल्या टीम ब्रुशेट यांनी एका मुलाखतीत परग्रहावरील जीव हे अवकाशात किंवा अंतराळात नसून पृथ्वीवरील महासागरांच्या तळाशी असल्याचं म्हटलं आहे. पाण्याखाली या जीवांची विमाने अत्यंत वेगाने प्रवास करतात असं आपल्याला एका लष्करी अधिकार्‍याने सांगितल्याचा दावाही टीम ब्रुशेट यांनी केला आहे. त्यांनी या अधिकार्‍याच्या नावाचा खुलासा केलेला नाही. अमेरिकेतील टेनेसी राज्यातील लोकनियुक्त प्रतिनिधी असलेल्या ब्रुशेट यांनी यापूर्वीही युएफओबद्दल मुक्तपणे भाष्य केलेलं आहे. परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल अमेरिकी सरकारकडे गुप्त माहिती असून ही माहिती जाणूनबुजून सार्वजनिक करण्यात आलेली नाही, असं ब्रुशेट यांचं म्हणणं आहे. मॅट गार्त्झ या माजी खासदाराच्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीत ब्रुशेट यांनी परग्रहावरील जीवसृष्टीसंदर्भात ही विधानं केली आहेत. ‘पाण्याखाली शेकडो किलोमीटर प्रति तास वेगाने कोणत्यातरी रहस्यमय गोष्टी प्रवास करत असल्याचं त्यांनी मला सांगितलं आहे. या वस्तूंचा आकार एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढा आहे. या प्रकरणाची नोंदही करण्यात आली आहे. मला एका अ‍ॅडमिरलने हे सांगितलं आहे, ‘असा दावा ब्रुशेट यांनी केला आहे. याच कार्यक्रमामध्ये मुलाखतकार मॅट यांनी अनेकदा यूएफओ हे पाण्यावरच दिसून येत असल्याचं निर्देशित करताना पहायला मिळाले. हाच संदर्भ देत पाण्याखाली खरोखरच परग्रहावरील जीव राहतात हा दावा पटतो का, असा प्रश्न मॅट यांनी ब्रुशेट यांना विचारला. विश्वाचा पसारा पाहता काहीही शक्य आहे, असं उत्तर ब्रुशेट यांनी दिलं. पाण्याखाली परग्रहावरील जीवांचे तळ असतील, अशी शक्यताही ब्रुशेट यांनी व्यक्त केली. तसेच परग्रहावरील जीवांना घाबरण्याची गरज नसल्याचंही ब्रुटेश म्हणाले. ‘ते आपल्याला इजा पोहोचवतील याबद्दल मला चिंता वाटत नाही. कारण त्यांच्याकडे जी क्षमता आहे त्याचा विचार केल्यास त्यांनी आपल्याला यापूर्वीच संपवलं असतं,’असं विधान ब्रुशेट यांनी केलं आहे. 2023 मध्ये अमेरिकी एअरफोर्सच्या गुप्तचर विभागातील अधिकार्‍याने अमेरिकी सरकारकडे परग्रहावरील जीवांचा मृतदेह असल्याचा दावा केला होता. पेंटागॉनने हा दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT