बोस्टन (अमेरिका) : अल्पावधीत प्रमाणाबाहेर मद्यपान करणे, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘बिंज ड्रिंकिंग’ म्हटले जाते, ते आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका ताज्या संशोधनानुसार, केवळ एकदाच अतिप्रमाणात मद्यपान केल्याने आतड्यांच्या आतील थराचे गंभीर नुकसान होऊन विषारी घटक थेट रक्तात मिसळू शकतात.
संशोधनानुसार, दोन तासांच्या कालावधीत महिलांनी चार पेग किंवा पुरुषांनी पाच पेगपेक्षा जास्त मद्यपान करणे म्हणजे ‘बिंज ड्रिंकिंग’ होय. अशा प्रकारे मद्यपान केल्याने आतड्यांची संरक्षक भिंत कमकुवत होते. आतड्यांचे मुख्य काम बॅक्टेरिया आणि विषारी घटक रक्तात जाण्यापासून रोखणे हे असते. मात्र, अतिमद्यपानामुळे या थराला छिद्रे पडतात, ज्याला ‘लीकी गट’ असे म्हणतात. यामुळे हानिकारक घटक शरीरात प्रवेश करतात आणि अंतर्गत सूज निर्माण होते.
हार्वर्डच्या प्रोफेसर आणि मुख्य लेखिका ग्योंगी जाबो यांनी सांगितले की, दीर्घकाळ मद्यपान केल्याने यकृत खराब होते हे ठाऊक होते; पण एकदाच केलेल्या अतिमद्यपानामुळेही आतड्यांची सुरक्षा यंत्रणा कोलमडू शकते, हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. संशोधनात असे आढळले की, मद्यपानानंतर ‘न्यूट्रोफिल’ नावाच्या रोगप्रतिकारक पेशी आतड्यांच्या थरात जमा होतात. या पेशी ‘नेटस्’ नावाचे जाळे सोडतात, ज्यामुळे लहान आतड्याच्या वरच्या भागाला जखम होते आणि भिंत कमकुवत होते.
आतड्यांना होणारी ही ईजा पुढे जाऊन यकृत आणि पचनाशी संबंधित गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते. संशोधकांनी प्रयोगादरम्यान एका विशिष्ट एन्झाईमचा वापर करून हे ‘नेटस्’ ब्लॉक केले. यामुळे आतड्यांमधून होणारी बॅक्टेरियाची गळती लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. याचा अर्थ भविष्यात मद्यपानामुळे होणार्या नुकसानावर उपचार शोधणे शक्य होऊ शकते.