Palak Paneer Smell Controversy | ‘पालक पनीर’ आणि 1.8 कोटींची नुकसानभरपाई! 
विश्वसंचार

Palak Paneer Smell Controversy | ‘पालक पनीर’ आणि 1.8 कोटींची नुकसानभरपाई!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका विद्यापीठात ‘पालक पनीर’च्या वासावरून सुरू झालेला वाद चक्क न्यायालयापर्यंत पोहोचला. भारतीय खाद्यपदार्थाच्या वासावरून भारतीय विद्यार्थ्यांना चक्क पीएचडी पदवी नाकारून कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते. मात्र, आता न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर संबंधित विद्यापीठाला या विद्यार्थ्यांना 2 लाख डॉलर (सुमारे 1.8 कोटी रुपये) नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना 2023 मध्ये अमेरिकेतील कोलोराडो बोल्डर विद्यापीठात घडली. 34 वर्षीय आदित्य प्रकाश आणि 35 वर्षीय उर्मी भट्टाचार्य हे दोघे तेथे पीएचडीचे शिक्षण घेत होते. 5 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य प्रकाश विद्यापीठाच्या ओव्हनमध्ये आपले दुपारचे जेवण गरम करण्यासाठी गेले होते. त्यांच्या डब्यात ‘पालक पनीर’ची भाजी होती. जेवण गरम करत असताना तेथील कर्मचार्‍यांनी त्यांना मज्जाव केला. भाजीचा ‘घाणेरडा वास’ येत असल्याचा दावा करत कर्मचार्‍यांनी त्यांना ओव्हन वापरू दिला नाही.

‘माझे जेवण हा माझा अभिमान आहे. त्याचा वास चांगला आहे की वाईट, हे दुसरे कोणी ठरवू शकत नाही, असे म्हणत आदित्य यांनी या भेदभावाचा विरोध केला. आदित्य यांची जोडीदार उर्मी ही देखील त्यांच्या समर्थनासाठी पुढे आली. या दोघांनी विद्यापीठावर भेदभावाचे आरोप केले. या वादाचे पर्यवसान असे झाले की उर्मीला कोणत्याही कारणाशिवाय शिक्षिकेच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले. विद्यापीठाने दोघांनाही पीएचडीची पदवी देण्यास आणि पुढील शिक्षणास नकार दिला. त्यांना कॅम्पसमधून बाहेर काढण्यात आले.

आपले शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याचे पाहून या जोडप्याने कोलोराडो जिल्हा न्यायालयाचे दरवाजे खटखटाले. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात करून विद्यापीठाने अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून विद्यापीठ प्रशासनाने तडजोड करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निकालानुसार विद्यापीठ या दोन्ही विद्यार्थ्यांना 2 लाख डॉलर (1.8 कोटी रुपये) नुकसानभरपाई देणार. दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांची पीएचडी पदवी बहाल करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाने या दोघांवर कायमस्वरूपी बंदी घातली असून, भविष्यात त्यांना तिथे शिक्षण किंवा नोकरी करता येणार नाही. खाद्यसंस्कृतीवरून होणार्‍या भेदभावाविरुद्धचा हा लढा भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठा विजय मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT