न्यूयॉर्क : अमेरिकेतील एव्हिएशन स्टार्टअप ऑट एरोस्पेसने एक असे खासगी जेट डिझाइन केले आहे, ज्यामध्ये पारंपरिक खिडक्या नसतील. त्याऐवजी त्यामध्ये स्क्रीन म्हणजेच डिजिटल पॅनेलचा वापर केला जाईल. या भविष्यवेधी जेटचे नाव ‘फँटम 3500’ आहे. हे जेट इंधनाच्या बचतीत अत्यंत प्रभावी असून, आतून एखाद्या विज्ञान-फिक्शन चित्रपटातील द़ृश्यासारखा अनुभव देईल. या खास जेटचे केबिन अश्रूच्या थेंबासारखे (Tear- drop) असेल. खिडक्यांच्या जागी, संपूर्ण भिंतीवर 6 फूट लांबीचे डिजिटल पॅनेल असतील, जे बाहेरचे द़ृश्य आभासी (Virtual) स्वरूपात दाखवतील. हे द़ृश्य बाहेर लावलेल्या उच्च-रिझोल्यूशन कॅमेर्यांमधून थेट प्रक्षेपित केले जाईल.
कंपनीचे सीईओ पॉल टॉउ म्हणाले, ‘आता तुम्हाला बाहेर पाहण्यासाठी वाकण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सीटवरूनच चारही बाजूचे संपूर्ण द़ृश्य पाहू शकाल. हा अनुभव खूपच अद्भुत असेल.’ या जेटमध्ये एकूण 9 सीटस् असतील आणि ते 22 फूट लांब व 7.5 फूट रुंद असेल. या जेटसाठी कंपनीला आधीच मोठा करार मिळाला आहे. प्रायव्हेट जेट कंपनी फ्लेक्सजेटने हे जेट खरेदी करण्याचा करार केला आहे. कंपनी पुढील 6 ते 8 वर्षांत 300 जेटस् खरेदी करणार आहे. जर प्रत्येक जेटची बाजार किंमत अंदाजे 19.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 163 कोटी रुपये) मानली, तर हा सौदा 5.85 अब्ज डॉलर्सपर्यंत (सुमारे 48,700 कोटी रुपये) पोहोचू शकतो. पहिली डिलिव्हरी 2030 मध्ये होण्याची अपेक्षा आहे.
खिडक्या नसलेल्या विमानाची कल्पना मात्र सगळ्यांनाच आवडलेली नाही. सोशल मीडियावर अनेक लोकांनी याला ‘पत्र्याच्या डब्यातून उडण्यासारखे’ म्हटले आहे. काहींनी प्रतिक्रिया दिली की, खिडकीतून दिसणारे वास्तविक द़ृश्य कोणत्याही डिजिटल स्क्रीनपेक्षा चांगले असते. हे जेट फक्त दिसायलाच वेगळे नसेल, तर इंधनाच्या खर्चातही क्रांती घडवून आणेल. कंपनीचा दावा आहे की, त्याच्या डिझाइनमुळे 60 टक्के पर्यंत इंधनाची बचत होईल. जर यात शाश्वत इंजिन डिझेल (Sustainable Engine Diesel) वापरले, तर 90 टक्केपर्यंत बचत शक्य आहे.
फँटम 3500 चा पहिला प्रोटोटाईप कंपनीने एका परिषदेत सादर केला आहे. परंतु, त्याची पहिली चाचणी उड्डाण 2027 मध्ये होईल, कारण त्याला अजून एफएए (FAA) कडून प्रमाणपत्र मिळवायचे आहे. कंपनीचे मत आहे की, भविष्यात हे जेट खासगी उड्डाणे इतके स्वस्त करू शकते की लोक बिझनेस क्लासऐवजी खासगी फ्लाईटची निवड करतील. सीईओंच्या म्हणण्यानुसार, श्रीमंत लोकांसाठी जगभरातील उड्डाणांची बाजारपेठ अंतराळ प्रवासापेक्षा कितीतरी मोठी आहे.