वॉशिंग्टन : आकाशातून करोडो माशा जमिनीवर पडत असल्याचे द़ृश्य एखाद्या भयानक स्वप्नासारखे वाटू शकते. मात्र, अमेरिकेच्या नैऋत्य सीमेवर पशुधनाला वाचवण्यासाठी हाच सर्वोत्तम उपाय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा संपूर्ण प्रदेश सध्या ‘न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म’ नावाच्या एका भयंकर किड्याच्या प्रकोपाचा सामना करत आहे. ‘न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म’ हा एका विशिष्ट माशीचा अळी (लार्वा) प्रकार आहे, जो उष्ण रक्त असलेल्या प्राण्यांच्या जखमांमध्ये घर करतो आणि त्यांना हळूहळू जिवंत खातो. 2023 च्या सुरुवातीपासून हा प्रकोप संपूर्ण मध्य अमेरिकेत पसरत असून, पनामा, कोस्टा रिका, निकाराग्वा, होंडुरास, ग्वाटेमाला, बेलीझ आणि अल साल्वाडोर या देशांमध्ये त्याचा संसर्ग आढळून आला आहे.
ही मांसाहारी माशी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण मेक्सिकोमध्ये पोहोचली, ज्यामुळे अमेरिकेच्या कृषी उद्योगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या धोक्यामुळे सीमेवरील अनेक गुरे, घोडे आणि बायसन (गवे) यांच्या व्यापाराची बंदरे बंद करावी लागली. ‘न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म’ हे ‘कोक्लिओमिया होमिनिवोरॅक्स’ नावाच्या चमकदार निळ्या रंगाच्या माशीचे परजीवी अळी स्वरूप आहे. टेक्सास ए अँड एम विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. फिलिप कॉफमन यांनी सांगितले की, ‘पश्चिम गोलार्धात आढळणार्या इतर सर्व माश्यांच्या विपरीत, न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म मृत प्राण्यांऐवजी जिवंत प्राण्यांचे मांस खातो.’ मिलनानंतर, मादी माशी एका जिवंत प्राण्याच्या शरीरावरील जखम शोधते आणि त्यावर 200 ते 300 अंडी घालते.
केवळ 12 ते 24 तासांत ही अंडी फुटतात आणि त्यातून निघालेल्या अळ्या तत्काळ त्या प्राण्याच्या मांसात शिरून ते खाऊ लागतात, ज्यामुळे मोठी आणि खोल जखम तयार होते. अनेक दिवस हे मांस खाल्ल्यानंतर, या अळ्या प्राण्याच्या शरीरातून जमिनीवर पडतात आणि नंतर पूर्ण वाढ झालेल्या माश्यांच्या रूपात बाहेर येतात. हे किडे घोडे, गायी, पाळीव प्राणी आणि क्वचित प्रसंगी माणसांनाही संक्रमित करतात. अमेरिकेला या आक्रमक किड्यांचा सामना करण्याची ही पहिली वेळ नाही. 1960 आणि 1970 च्या दशकात अमेरिकेने याच योजनेद्वारे ‘न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म’ला जवळपास पूर्णपणे नष्ट केले होते. या योजनेत, नसबंदी केलेल्या नर माश्यांची मोठ्या प्रमाणात पैदास केली जाते. त्यानंतर या निर्बीज नर माश्यांना विमानातून जंगलात आणि प्रभावित भागात सोडले जाते. या नर माश्या जंगली मादी माश्यांसोबत मीलन करतात, परंतु त्यांच्या मिलनातून फलदायी अंडी तयार होत नाहीत. यामुळे हळूहळू या किड्यांची लोकसंख्या कमी होत जाते. आता हे किडे पुन्हा उत्तरेकडे पसरत असताना, हीच जुनी रणनीती पुन्हा एकदा यशस्वी होईल, अशी अधिकार्यांना आशा आहे.