नवी दिल्ली : भारतासह जगभरातील मोठ्या देशांमध्ये वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून गेल्या काही काळापासून ‘एअर टॅक्सी’ सुरू करण्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. आता या दिशेने एक पाऊल पुढे टाकत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी देशात लवकरच म्हणजे दोन वर्षांतच एअर टॅक्सी सेवा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.
नायडू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की, देशातील तिसरे ‘eVTOL’ (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग) डिझाईन ऑर्गनायझेशन अप्रूवल (DOA) प्रदान करताना ते अत्यंत उत्सुक आहेत. त्यांनी लिहिले, ‘दोन वर्षांच्या आत भारत केवळ eVTOL चे संचालनच करणार नाही, तर जगभरासाठी प्रगत हवाई वाहतूक उपायांचे (Advanced Air Mobility Solutions) डिझाईन आणि निर्मितीदेखील करेल. इतिहास पाहिला तर आजच्याच दिवशी विल्बर राईट यांनी उड्डाणाचे पहिले प्रात्यक्षिक दाखवले होते.’
बंगळूर येथील ‘सरला एव्हिएशन’ या कंपनीला हे डिझाईन अप्रूवल देण्यात आले आहे. या प्रसंगी सरला एव्हिएशनचे सहसंस्थापक आणि सीटीओ राकेश गावकर म्हणाले, ‘आम्ही दर १८ महिन्यांनी एक नवीन प्रोटोटाईप (प्रतिकृती) तयार करतो. आमचा पुढील प्रोटोटाईप जानेवारी २०२७ मध्ये येईल आणि तो उड्डाण भरेल. ‘विकसित भारत २०४७’ चे स्वप्न एअर टॅक्सीवर आधारित असेल आणि ते साकार करणारी आमची टीम आहे.’ देशात या तंत्रज्ञानावर आधारित एअर टॅक्सी सुरू झाल्यास रस्त्यांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. प्रवाशांचा वेळ वाचेल आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद व सुलभतेने पोहोचू शकतील.
कसे आहे eVTOL विमान?
eVTOL म्हणजे ‘इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग’. या तंत्रज्ञानावर चालणाऱ्या विमानांना उड्डाण करण्यासाठी किंवा उतरण्यासाठी मोठ्या धावपट्टीची (Runway) गरज नसते. ही विमाने हेलिकॉप्टरप्रमाणे एकाच जागेवरून थेट उड्डाण करू शकतात आणि अतिशय कमी जागेत उतरू शकतात. ही विमाने पूर्णपणे विजेवर चालत असल्याने ती पर्यावरणपूरक असतात.