Air taxi launch 2026 | हवाई टॅक्सींचे स्वप्न यावर्षी होऊ शकते साकार XH4D
विश्वसंचार

Air taxi launch 2026 | हवाई टॅक्सींचे स्वप्न यावर्षी होऊ शकते साकार

पुढारी वृत्तसेवा

दुबई/वॉशिंग्टन : विज्ञानावर आधारित चित्रपटांमधील ‘उडणार्‍या टॅक्सी’ (Flying Taxis) आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहेत. अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी ‘इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग’ (eVTOL) विमानांच्या व्यापारीकरणासाठी प्रयत्न वेगवान केले आहेत. ‘जोबी एव्हिएशन’ आणि ‘आर्चर एव्हिएशन’ यांसारख्या कंपन्यांनी या वर्षाच्या अखेरीस दुबईमध्ये आपली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे.

तंत्रज्ञान आणि आव्हाने

हे eVTOL विमान दिसायला एखाद्या मोठ्या ड्रोनसारखे असते, ज्याला अनेक इलेक्ट्रिक मोटर्स आणि पंखे असतात. पारंपरिक हेलिकॉप्टरच्या तुलनेत ही विमाने कमी आवाज करणारी आणि प्रदूषणमुक्त असतील, असा दावा केला जात आहे. मात्र, प्रोटोटाईपपासून (नमुना) प्रत्यक्ष सेवेपर्यंतचा प्रवास तांत्रिक आणि नियामक अडथळ्यांनी भरलेला आहे.

नियामक मंजुरीचा अडथळा

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) 26 राज्यांमध्ये या विमानांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत; परंतु प्रवाशांच्या वाहतुकीसाठी अद्याप पूर्णतः हिरवा कंदील मिळालेला नाही. या टॅक्सींसाठी ‘व्हर्टिपोर्टस्’ (विशिष्ट टेक-ऑफ आणि लँडिंग साईटस्) उभारणे आणि शहरी नियोजनात त्यांचा समावेश करणे हे मोठे आर्थिक आव्हान आहे.

मागणी आणि प्रत्यक्षातील अडथळे

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हवाई टॅक्सी सुरू करण्याची योजना इंजिनच्या प्रमाणपत्रातील विलंबामुळे रद्द करण्यात आली होती. तसेच, लॉस एंजेलिसमधील फिफा (FIFA) वर्ल्ड कपपूर्वी सेवा सुरू करण्याचे आर्चर एव्हिएशनचे उद्दिष्ट आता 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

तज्ज्ञांचे मत :

‘आम्हाला वाटते की पूर्ण क्षमतेने ही सेवा सुरू होण्यासाठी पुढच्या दशकाचा मध्य उजाडेल, सध्या तरी हे इतक्या लवकर शक्य दिसत नाही,’ असे एसएमजी कन्सल्टिंगचे संस्थापक सर्जियो सेकुट्टा यांनी म्हटले आहे. हवाई टॅक्सी सेवा हे वाहतुकीचे एक रोमांचक भविष्य असले, तरी सामान्य नागरिकांसाठी ती रोजच्या वापराचा भाग बनण्यासाठी किमान एक दशक वाट पाहावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT