Air pollution Pudhari
विश्वसंचार

Air Pollution : वायू प्रदूषणामुळे वाढतोय विसरभोळेपणाचा धोका

अल्झायमरबाबत संशोधकांचा धोक्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : बिघडलेली जीवनशैली आणि आहारातील बदलांसोबतच आता पर्यावरणातील समस्या मानवी आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरत आहेत. कमी वयात हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि कॅन्सरचे प्रमाण वाढत असतानाच आता अल्झायमर आणि डिमेंशिया (स्मृतीभंश) यांसारख्या मेंदूच्या आजारांनी आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. सामान्यतः अल्झायमरची लक्षणे 60 वर्षांनंतरच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. मात्र, अलिकडील अनेक अहवालांनुसार, आता वयाच्या 50 व्या वर्षीच लोकांमध्ये विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमकुवत होऊ लागली आहे. दिल्लीसारख्या प्रदूषित शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे.

संशोधकांच्या एका पथकाने इशारा दिला आहे की, जे लोक सतत वायू प्रदूषणाच्या संपर्कात येतात, त्यांना अल्झायमर होण्याचा धोका जास्त असतो. अमेरिकेतील 2.78 कोटींहून अधिक लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळले आहे की वायू प्रदूषण थेट मेंदूच्या पेशींवर परिणाम करते.

उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकपेक्षाही वायू प्रदूषण अल्झायमरसाठी अधिक घातक ठरू शकते. ज्यांना यापूर्वी ‌‘बेन स्ट्रोक‌’चा त्रास झाला आहे, त्यांच्यावर प्रदूषणाचा परिणाम अधिक गंभीर होतो. अल्झायमर हा मेंदूचा एक गंभीर आजार आहे, जो स्मृती, विचार करण्याची क्षमता आणि वर्तनावर परिणाम करतो. या आजारामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते, ज्यामुळे पुढील लक्षणे दिसतात : 1. दैनंदिन कामे करण्यात अडचण येणे, 2. स्मरणशक्ती कमकुवत होणे, 3. स्वभावात बदल होणे (उदा. चिडचिड किंवा गोंधळलेले राहणे). भारतातील वाढते वायू प्रदूषण, विशेषतः दिल्लीसारख्या महानगरांमधील हवेची खालावलेली गुणवत्ता, या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. प्रदूषणापासून बचाव करणे ही केवळ पर्यावरणाची गरज नसून ती आता मानसिक आरोग्य टिकवण्यासाठीची निकड बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT