वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आता केवळ चॅटबॉटस् किंवा सर्च इंजिनपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते आता मानवी शरीर समजून घेण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे. ‘मेटा’ प्रमुख मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून, ‘एआय’च्या मदतीने मानवी पेशींचे डिजिटल मॉडेल बनवण्याचे काम सुरू केले आहे.
‘चॅन झुकरबर्ग बायोहब’ या संशोधन संस्थेच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य हेतू मानवी पेशींची कार्यपद्धती ‘एआय’च्या मदतीने समजून घेणे हा आहे. पेशींचे डिजिटल मॉडेल तयार केल्यामुळे रोगांचे स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल आणि त्यावरील उपचार शोधणे सोपे होईल. मात्र, तज्ज्ञांच्या मते सर्वच आजारांवर पूर्णपणे उपचार शोधणे अजूनही कठीण आहे. 2016 मध्ये स्थापन झालेल्या या बायोहबने आता पेशींच्या वर्तनाचे ‘सिम्युलेशन’ करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 4100 कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
याअंतर्गत एप्रिल 2026 मध्ये ‘व्हर्च्युअल बायोलॉजी इनिशिएटिव्ह’ सुरू करण्यात आले आहे. हा 5 वर्षांचा कार्यक्रम आहे. त्यामधील 100 दशलक्ष डॉलर्स जागतिक सहकार्य आणि बाह्य संशोधनासाठी असून, 400 दशलक्ष डॉलर्स हे प्रगत इमेजिंग, रेणू मापन आणि सेल स्टडी यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आहेत. या मोहिमेत केवळ बायोहबच नाही, तर जगातील दिग्गज संस्थाही एकत्र आल्या आहेत. यामध्ये अॅलन इन्स्टिट्यूट, ब्रॉड इन्स्टिट्यूट आणि वेलकम सँगर इन्स्टिट्यूट यांसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे.