न्यूयॉर्क : बौद्धिक क्षमतेत होणारी घट किंवा स्मृतिभ्रंशाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा अधिकृत निदानापूर्वीच दिसू लागतात. मात्र, ही लक्षणे डॉक्टरांच्या साध्या टिपणांमध्ये दडलेली असतात. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून ही सुरुवातीची चिन्हे ओळखणे शक्य असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.
7 जानेवारी रोजी ‘पक्षि डिजिटल मेडिसिन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, एआय प्रणाली डॉक्टरांच्या नोटस्मधील विशिष्ट पॅटर्न शोधून स्मरणशक्ती, विचार करण्याची प्रक्रिया किंवा वर्तनातील बदल यांसारखे धोक्याचे संकेत ओळखू शकते. संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे- कुटुंबीयांच्या तक्रारींची दखल : रुग्णाला वारंवार होणारा गोंधळ किंवा त्यांच्यासोबत येणार्या नातेवाईकांनी व्यक्त केलेली चिंता, अशा नोंदींमधून एआय संभाव्य आजाराचा अंदाज घेते.
निदान नव्हे, तर ‘स्क्रीनिंग’ ही प्रणाली थेट आजाराचे निदान करत नाही, तर ज्या रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, त्यांना ‘फ्लॅग’ किंवा चिन्हांकित करते.
डॉक्टरांना मदत : मॅसॅच्युसेटस् जनरल हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजीच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. लिडिया मौरा यांनी सांगितले की, ‘या प्रणालीचा उद्देश डॉक्टरांची जागा घेणे नसून, त्यांना एक साहायक म्हणून मदत करणे हा आहे. जिथे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे, तिथे ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरेल.‘ या संशोधनासाठी संशोधकांनी एकाच वेळी पाच एआय एजंटस्च्या संचाचा वापर केला आहे. हे पाचही प्रोग्राम्स एकमेकांच्या कामाचे पुनरावलोकन करतात आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय क्लिनिकल नोटस्चा अचूक अर्थ लावतात. संशोधकांनी यासाठी मेटाच्या ‘Llama 3.1’ या मॉडेलचा वापर केला.
या प्रणालीला रुग्णालयातील तीन वर्षांच्या डॉक्टरांच्या नोटस्, प्रगती अहवाल आणि डिस्चार्ज समरी अभ्यासायला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे ‘एआय’ ने अत्यंत अचूकपणे मानसिक स्थितीतील बदलांचे संकेत शोधून काढले. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या तज्ज्ञ जुलिया अॅडलर-मिल्स्टीन यांच्या मते, या स्क्रीनिंगचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा हे संकेत अचूक असतील आणि ते योग्य वैद्यकीय पथकापर्यंत वेळेत पोहोचतील. जर या माहितीवर आधारित पुढील उपचार प्रक्रिया स्पष्ट असेल, तरच ही यंत्रणा वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवू शकते.