AI Moon Map | चंद्राचा नवा नकाशा तयार करणार एआय 
विश्वसंचार

AI Moon Map | चंद्राचा नवा नकाशा तयार करणार एआय

नासा-आयबीएमकडून ‘लूनर फाऊंडेशन मॉडेल’ विकसित

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : चंद्राच्या पृष्ठभागाचा आतापर्यंतपेक्षा अधिक सविस्तर आणि अचूक नकाशा तयार करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संस्था अर्थात नासा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आयबीएम कंपनी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित नवे मॉडेल विकसित केले आहे. ‘लूनर फाऊंडेशन मॉडेल’ असे या मॉडेलचे नाव असून, चंद्राविषयी गेल्या अनेक दशकांत जमा झालेल्या मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करण्याची त्याची क्षमता आहे.

चंद्राभोवती फिरणाऱ्या विविध अंतराळयानांनी घेतलेली छायाचित्रे, तापमानाची माहिती, पृष्ठभागाचा परावर्तित प्रकाश आणि इतर निरीक्षणांचा मोठा साठा वैज्ञानिकांकडे आहे. ही माहिती एकत्र करून तिचे विश्लेषण करणे वेळखाऊ काम आहे. नव्या एआय मॉडेलमुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने करता येण्याची अपेक्षा आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग अधिक स्पष्टपणे ओळखणे, तेथील खडक आणि मातीची वैशिष्ट्ये समजून घेणे तसेच तापमानातील बदलांचा अभ्यास करणे यासाठी या मॉडेलचा उपयोग होऊ शकतो. विशेषतः चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील कायम सावलीत असलेल्या भागांमध्ये पाण्याच्या बर्फाची शक्यता आहे. अशा ठिकाणांची माहिती अधिक अचूकपणे मिळवण्यासाठीही एआयची मदत होऊ शकते.

चंद्रावर भविष्यात मानवाच्या मोहिमा वाढण्याच्या पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढते. संभाव्य लँडिंगची ठिकाणे, संसाधने आणि धोकादायक भूभाग यांचा अभ्यास करण्यासाठी अधिक अचूक नकाशे उपयुक्त ठरू शकतात.

एआयला मिळणार जुन्या डेटाचा आधार

या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ नव्या माहितीवर अवलंबून राहणार नाही. गेल्या अनेक वर्षांत विविध मोहिमांमधून जमा झालेल्या चंद्राच्या डेटाचा वापर करून एआयला चंद्राचा पृष्ठभाग अधिक चांगल्या प्रकारे ‘समजून’ घेण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. यामुळे भविष्यात चंद्रावरील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या जुन्या आणि नव्या माहितीचा एकत्रित वापर करणे सोपे होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT