बर्लिन : जर्मनीतील वुर्जबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांनी एका अशा अत्याधुनिक एआय टूलचा शोध लावला आहे, जो प्राचीन ‘कीलाकार’ किंवा ‘क्यूनिफॉर्म’ लिपीत लिहिलेल्या मातीच्या पाट्या वाचण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकत आहे. या शोधामुळे एकेकाळी अनातोलियावर (सध्याचे तुर्की) राज्य करणार्या ‘हित्ती’ संस्कृतीचे अनेक विसरलेले रहस्य जगासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या एआय टूलचे नाव ‘पैलियोग्राफिकम’ असे आहे. ही एक प्रगत ‘पॅटर्न-रेकग्निशन’ प्रणाली आहे, जी तीन हजार वर्षांपूर्वी मातीवर कोरलेल्या अक्षरांमधील मानवी लेखनाची विशिष्ट शैली आणि बारकावे आपोआप ओळखून घेते. संशोधकांच्या मते, हा शोध पुरातत्त्व क्षेत्रात एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नाही. वुर्जबर्ग विद्यापीठातील प्राचीन निकट पूर्व अध्ययन विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॅनियल श्वमर यांनी सांगितले की, ‘पैलियोग्राफिकम आमच्या कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलत आहे. यामुळे आमचे हजारो तास वाचत आहेत.‘हे सॉफ्टवेअर 50 लाखांहून अधिक क्यूनिफॉर्म अक्षरे असलेल्या तब्बल 70,000 डिजिटलाईज्ड फोटोंचे विश्लेषण करते आणि त्वरित एकाच प्रकारच्या किंवा मिळतेजुळते अक्षर संरचना शोधून काढते.
ज्या कामासाठी आधी मातीच्या पाच तुकड्यांची हाताने बारीक तुलना करण्यासाठी तीन दिवस लागायचे, ते काम आता हे एआय टूल अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण करते. हित्ती सभ्यता इसवी सन पूर्व 1600 च्या सुमारास आजच्या तुर्कीच्या भागात भरभराटीस आली होती. या संस्कृतीने आपल्या मागे मातीच्या पाट्यांवर कोरलेला एक मोठा लेखी इतिहास सोडला आहे. मात्र, शतकानुशतके हे दस्तावेज तुटून त्याचे तुकडे जगभरातील विविध संग्रहालयांमध्ये विखुरले गेले. हे दस्तावेज वाचण्यापूर्वी संशोधकांसमोर हे तुकडे योग्य प्रकारे जोडण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी क्यूनिफॉर्म लिपीच्या 375 वेगवेगळ्या चिन्हांमधील प्रत्येक लेखकाची वैयक्तिक लेखनशैली ओळखणे आवश्यक होते.
आजच्या हस्तलेखनाप्रमाणेच प्राचीन क्यूनिफॉर्म लिपीमध्येही काही अनोखी आव्हाने होती. या पाट्या लिहिणार्या सुमारे 400 लेखकांपैकी प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी शैली होती. काही लेखक मातीवर लेखणी इतक्या जोरात दाबायचे की अक्षरे अधिक ठळक आणि सुशोभीत दिसायची, तर काही लेखक अक्षरांमध्ये विशिष्ट अंतर राखायचे. हीच वैशिष्ट्ये ओळखणे आता विखुरलेले मजकूर जोडण्याची मुख्य गुरुकिल्ली बनली आहे. ही तंत्रज्ञान प्रणाली डॉर्टमुंडच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने विकसित करण्यात आली असून, ती ‘CuKa’ (संगणक-सहाय्यित क्यूनिफॉर्म विश्लेषण) नावाच्या पाच वर्षांच्या प्रोजेक्टवर आधारित आहे.
पुढील ध्येय काय आहे?
संशोधक आता जागतिक स्तरावरील हित्ती संस्कृतीच्या अभ्यासकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे या एआयला सातत्याने प्रशिक्षित करत आहेत. भविष्यात या एआयला अशा प्रकारे सक्षम करायचे आहे, जेणेकरून ते वेगवेगळ्या लेखकांच्या हाताचे लेखन आपोआप ओळखू शकेल. यात यश आल्यास विद्वान ‘हित्ती लेखन संस्कृतीचा एक सविस्तर सामाजिक इतिहास’ तयार करू शकतील, ज्यातून प्राचीन काळातील लेखक त्यांचे व्यावसायिक जीवन, कामाचा ताण किंवा घरून काम करताना कसे लिहायचे, याचे रंजक तपशील समोर येऊ शकतील.