AI reading human thoughts | ‘एआय’ आता वाचणार माणसाच्या मनातील विचार! 
विश्वसंचार

AI reading human thoughts | ‘एआय’ आता वाचणार माणसाच्या मनातील विचार!

पुढारी वृत्तसेवा

कॅलिफोर्निया : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या माध्यमातून आता मानवाच्या मनातील विचार वाचणे शक्य होणार आहे. मानवी मेंदूमधील सूक्ष्म विद्युत संकेत (इलेट्रिकल सिंग्नल) पूर्वी अतिशय गुंतागुंतीचे मानले जात होते; मात्र आता एआय या संकेतांचे विश्लेषण करून मनातील विचार शब्दांत रूपांतरित करण्यास सक्षम होत आहे. एखाद्या व्यक्तीने काहीही न बोलता, केवळ विचार केला आणि ते शब्द समोरच्या स्क्रीनवर टाईप झाले तर? हे एखाद्या विज्ञानावर आधारित चित्रपटातील द़ृश्यासारखे वाटत असले, तरी आता ते प्रत्यक्षात आले आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मधील संशोधकांनी एआयच्या मदतीने माइंड रीडिंग (मन वाचणे) तंत्रज्ञानात मोठे यश मिळवले आहे.

पक्षाघातग्रस्त महिलेचा अनुभव

अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे झालेल्या एका अभ्यासात 52 वर्षीय पक्षाघातग्रस्त महिलेच्या मेंदूत सूक्ष्म इलेक्ट्रोडस् बसवण्यात आले. तिला 19 वर्षांपूर्वी स्ट्रोक झाल्यामुळे ती स्पष्टपणे बोलू शकत नव्हती. या इलेक्ट्रोडस्द्वारे मेंदूतील न्यूरॉन्सचे संकेत संगणकाला पाठवले गेले. एआय प्रणालीने ती मनात उच्चारत असलेल्या शब्दांचे विश्लेषण करून ते स्क्रीनवर प्रत्यक्ष वेळेत (रियल टाईम) मजकूराच्या स्वरूपात दाखवले. म्हणजेच, ती बोलू शकत नसतानाही तिचे “मनातील विचार” शब्दांत दिसू लागले. या प्रयोगात एएलएस (अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस) या न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजाराने ग्रस्त इतर रुग्णांचाही सहभाग होता.

‘माईंड कॅप्शनिंग’ : कल्पना आणि द़ृश्यांचे वर्णन

स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधनाच्या यशानंतर काही महिन्यांनी जपानमधील संशोधकांनी ‘माईंड कॅप्शनिंग’ तंत्रज्ञान सादर केले. यात नॉन-इनव्हेसिव्ह (शस्त्रक्रिया न करता) मेंदू स्कॅन आणि तीन एआय साधनांचा वापर करून व्यक्ती काय पाहते किंवा मनात चित्रित करते याचे अचूक वर्णन तयार करण्यात आले.

मेंदू-संगणक इंटरफेस (बीसीएफ) म्हणजे काय?

या तंत्रज्ञानाला बे्रन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीएफ) म्हणतात. हे तंत्रज्ञान मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संवाद साधते. 1969 मध्ये अमेरिकन न्यूरोसायंटिस्ट इबरहार्ड फे्रत्झ यांनी प्रयोगातून दाखवले की माकड एकाच न्यूरॉनच्या क्रियेद्वारे उपकरण नियंत्रित करू शकते. त्याच काळात स्पॅनिश वैज्ञानिक जोस डेलगॅडो यांनी यांनी मेंदूला उत्तेजित करून बैलाचा आक्रमक हल्ला थांबवण्याचा प्रयोग केला होता.आज हे तंत्रज्ञान अधिक प्रगत झाले असून व्यावसायिक वापरासाठी काही कंपन्या पुढे येत आहेत. उदाहरणार्थ, एलन मस्क यांची न्यूरालिंक ही कंपनी मेंदूतील चिप्स विकसित करत आहे.

भविष्यात काय बदल होऊ शकतो?

तज्ज्ञांच्या मते, पुढील काही वर्षांत हे तंत्रज्ञान व्यापक प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते.या तंत्रज्ञानाचे संभाव्य फायदेही आहे. बोलू न शकणार्‍या रुग्णांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. न्यूरोलॉजिकल आजारांवरील उपचारात मदत होणार आहे. मानवी-संगणक संवाद अधिक वेगवान आणि थेट होणार आहे; मात्र यासोबत गोपनीयता, नैतिकता आणि सुरक्षिततेचे प्रश्नही उभे राहतील. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मेंदूतील गुंतागुंतीचे संकेत उलगडणे आता शक्य होत आहे. ‘मन वाचणे’ ही केवळ कल्पनारम्य गोष्ट राहिली नसून, ती वास्तवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. येत्या काळात हे तंत्रज्ञान मानवाच्या संवाद पद्धतीत आमूलाग्र बदल घडवू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT