विश्वसंचार

Heart Disease | ‘ईसीजी’द्वारे ‘एआय’ ओळखणार हृदयविकाराचा धोका

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्‍टन : अनेक वर्षांपासून डॉक्टरांच्या नजरेतून सुटलेला हृदयविकाराचा एक मोठा धोका आता एका साध्या ईसीजी (इलेक्‍ट्रोकार्डिओग्राम) चाचणीद्वारे ओळखता येणे शक्य होणार आहे. अमेरिकेतील 'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले' येथील संशोधकांनी विकसित केलेल्या एका नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेलने हा चमत्कार करून दाखवला असून, हे संशोधन 'नेचर' या जागतिक कीर्तीच्या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. यामध्ये अनेकदा तरुण खेळाडू आणि वरवर निरोगी दिसणाऱ्या लोकांचाही समावेश असतो. सध्याच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये ज्यांचे हृदय पूर्णपणे सामान्य दिसते, अशा लोकांच्या ईसीजीमधील लपलेले संकेत शोधून त्यांच्या जीवाला असलेला धोका वेळीच ओळखण्याचे काम हे एआय मॉडेल करणार आहे.

एआय मॉडेलने कसा शोधला धोका?

संशोधकांनी या अभ्यासासाठी स्वीडनमधील ४ लाख ४०हजारपेक्षा जास्त लोकांच्या ईसीजी अहवालांचा आणि त्यांच्या मृत्यूच्या नोंदींचा अभ्यास 'एआय'ला दिला. या डेटाच्या आधारे एआय मॉडेलने ईसीजीच्या तरंग लहरींमधील (व्‍हेवफॉर्म पॅटर्नस) असे सूक्ष्म बदल शोधून काढले, जे अचानक येणाऱ्या मृत्यूशी संबंधित होते. या मॉडेलची अचूकता तपासण्यासाठी अमेरिका आणि तैवानमधील रुग्णांच्या डेटावरही याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

सध्याच्या चाचण्या कुठे कमी पडतात?

सध्या डॉक्टर हृदयाचा धोका मोजण्यासाठी 'एलव्हीईएफ' (लेफ्‍ट व्‍हेन्‍ट्रीक्‍युलर इंजेक्‍शन फ्रॅक्‍शन) पद्धत वापरतात. ही पद्धत हृदय एका ठोक्याला किती रक्त पंप करते हे मोजते. परंतु, अनेकदा हृदय सामान्यपणे रक्त पंप करत असूनही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बर्कलेच्या एआय मॉडेलने अशा हाय-रिस्क (धोका असलेल्या) रुग्णांचा गट शोधून काढला, ज्यांच्यामध्ये अचानक मृत्यूचा वार्षिक दर ७% होता, तर पारंपारिक एलव्हीईएफ पद्धतीमध्ये हा दर केवळ ४.६% नोंदवला गेला होता. म्हणजेच, नेहमीच्या चाचण्या ज्यांना निरोगी समजतात, त्यांच्यातील धोका एआयने अचूक ओळखला.

‘एव्‍हीएल’भागात सापडला छुपा संकेत

शास्त्रज्ञांनी एआयने शोधलेल्या या पॅटर्नचा सखोल अभ्यास केला असता, ईसीजीच्या ‘एव्‍हीएल’ नावाच्या विशिष्ट भागात आणि ‘क्‍युआरएस कॉम्‍प्‍लेक्‍स’ '(हृदयाचा मुख्‍य इलेक्‍ट्रिकल सिंग्‍नल) मध्ये एक नवा वेव्हफॉर्म आढळून आला. वैद्यकीय जगतात यापूर्वी कधीही या संकेताचे वर्णन करण्यात आलेले नव्हते.

पुढील पाऊल

या तंत्रज्ञानाची आता अमेरिका, स्वीडन आणि तैवानमधील रुग्णालयांमध्ये थेट चाचणी घेतली जात आहे. जर एआयने एखाद्या रुग्णाचा ईसीजी धोकादायक म्हणून चिन्हांकित केला, तर डॉक्टर त्याला वेळीच सावध करून पुढील उपचार सुरू करू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT