Indus Valley script AI | आता सिंधू संस्कृतीमधील लिपी ‘एआय’च्या मदतीने वाचण्याचा प्रयत्न 
विश्वसंचार

Indus Valley script AI | आता सिंधू संस्कृतीमधील लिपी ‘एआय’च्या मदतीने वाचण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

लंडन : जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या सिंधू संस्कृतीच्या गूढ लिपीचा उलगडा करण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. सुमारे 4,000 वर्षांपूर्वी आजचा पाकिस्तान, पश्चिम भारत, पूर्व इराण आणि अफगाणिस्तानच्या काही भागांत बहरलेल्या या संस्कृतीची लिपी आजही शास्त्रज्ञांसाठी एक मोठे आव्हान ठरली आहे.

या लिपीला ‘हडप्पा लिपी’ असेही म्हटले जाते. यात शेकडो चिन्हांचा समावेश आहे. काही चिन्हे हिर्‍यासारखी दिसतात, तर काही ‘ U’ आकाराची किंवा ओव्हल (लंबवर्तुळाकार) आकाराची आहेत. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ वुल्व्हरहॅम्प्टनचे संशोधक मायकल फिलिप ओक्स यांच्या मते, या लिपीतील उपलब्ध मजकूर प्रामुख्याने दगड आणि मातीवर कोरलेला आढळतो. संशोधकांसमोर या लिपीचा अर्थ लावताना काही मुख्य अडचणी आहेत : उपलब्ध असलेल्या मजकुराची सरासरी लांबी अत्यंत कमी (केवळ पाच चिन्हे) आहे.

या लिपीचा अर्थ लावण्यासाठी ‘रोसेटा स्टोन’सारखा (ज्यामध्ये एकाच मजकुराचे दोन भाषांत अनुवाद असतात) कोणताही आधार अद्याप सापडलेला नाही. ही चिन्हे नेमकी कोणती भाषा दर्शवतात, की ती केवळ व्यक्ती किंवा संस्थांचे संकेत (Emblems) आहेत, यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या लिपीचा उलगडा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. संगणकीय भाषाशास्त्रातील प्रगतीमुळे या चिन्हांच्या रचनेचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. मात्र, केवळ एआयवर अवलंबून न राहता मानवी संशोधकांचे मार्गदर्शनही तितकेच आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व 2600 ते 1900 या काळात अस्तित्वात होती. जर या लिपीचा अर्थ लागला, तर प्राचीन मानवी इतिहासातील अनेक नवीन पैलू समोर येऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT