File Photo
विश्वसंचार

‘एआय’ने बनला ब्रॅड पिट; महिलेची केली 7 कोटींची फसवणूक!

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : सध्याचा जमाना ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. या बुद्धिमत्तेचा गैरवापरही होऊ शकतो, असे खुद्द ‘एआय’चे जनक असलेल्या जॉन मॅककॅर्थी यांनीही म्हटले होते. सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एका फ्रेंच महिलेची अशाच प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून एका दुसर्‍याच व्यक्तीचे सोंग घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेची चक्क हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिटच्या नावाने फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात अ‍ॅनी नावाच्या 53 वर्षीय महिलेने अभिनेत्याच्या उपचारासाठी मदत म्हणून 830,000 युरो इतकी रक्कम गमावली आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, फसवणूक झालेल्या महिलेने एका फ्रेंच चॅनलला माहिती दिली की, फेब्रुवारी 2023 मध्ये इंटिरिअर डिझायनर असलेल्या अ‍ॅनीला ब्रॅड पिटची आई असल्याचा दावा करणार्‍या एका व्यक्तीकडून सोशल मीडियावर मेसेज पाठवण्यात आला. अ‍ॅनीने टिग्नेस येथे एक महागड्या स्की ट्रिपवर गेल्याची पोस्ट केली होती. त्यानंतर तिला हा मॅसेज पाठवण्यात आला होता. या पोस्टनेच फसवणूक करणार्‍यांचे लक्ष अ‍ॅनीकडे वेधून घेतलं असू शकतं, असं सांगितलं जात आहे. थोड्या कालावधीनंतर ब्रॅड पिट असल्याचे भासवणार्‍या एका अकाऊंटवरून पुन्हा एकदा अ‍ॅनीला मेसेज पाठवण्यात आला.

फसवणूक करणार्‍याने ब्रॅड पिटच्या आईने तिच्याबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी सांगितल्याचा दावा केला. या मैत्रीपूर्ण संभाषणामुळे त्या दोघांमधील विश्वास वाढल्याचं अ‍ॅनीनं सांगितलं. अ‍ॅनीने सांगितलं की, “तुमच्याबद्दल असं काहीतरी लिहिणारे पुरुष फार कमी आहेत. मी ज्याच्याशी बोलत होते, तो माणूस मला आवडला. त्याला महिलांशी कसं बोलावं हे माहीत होतं, अशा गोष्टी नेहमीच फार काळजीपूर्वक केल्या जातात’. अ‍ॅनीला सुरुवातीला संशय आला; पण फसवणूक करणार्‍याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेले ब्रॅड पिटचे फोटो आणि व्हिडीओ पाठवल्यानंतर काही काळांनंतर तिचा पूर्ण विश्वास बसला. काही दिवसांनंतर या खोट्या ब्रॅड पिटने अ‍ॅनीला महागडं गिफ्ट देण्याचं वचन देत मागणी देखील घातली; पण यामध्ये एक अडचण होती, हे महागडे गिफ्ट मिळवण्यासाठी तिला कस्टम फी म्हणून काही रक्कम द्यावी लागणार होती. यामध्ये तिने 9,000 युरो दिले.

अ‍ॅनी ही ठराविक रक्कम देण्यासाठी तयार झाल्यानंतर या मागण्या हळूहळू वाढू लागल्या. लक्षाधीश पतीकडून घटस्फोटानंतर आपल्याला मोठी रक्कम मिळणार असल्याचे अ‍ॅनीने फसवणूक करणार्‍या मित्राला सांगितले होते. हीच संधी साधून फसवणूक करणार्‍याने त्याची रक्कम वाढवण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर किडनीच्या उपचारासाठी आपल्याला पैसे हवे आहेत; पण अँजेलिना जोली बरोबर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याने आपण आपल्या खात्यातील पैसे काढू शकत नाही, असंही अ‍ॅनीला पटवून देण्यात आलं. आपण सांगतोय त्यावर विश्वास बसावा म्हणून फसवणूक करणार्‍याने हॉस्पिटलच्या बेडवर पडून असलेल्या ब्रॅड पिटचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले फोटोदेखील पाठवले. दोघांमध्ये टेक्स मेसेज आणि फोटोंची देवाणघेवाण सातत्याने सुरू असताना फसवणूक करणार्‍याने फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉल करणे मात्र टाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT